ह्रदयद्रावक! जीवलग मित्राच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसातच निघाली अंत्ययात्रा; अख्खे गाव हळहळले

नामपूर (जि.नाशिक) : सामाजिक व सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळविणारे दोन जीवलग मित्र...जीवनाच्या अखेरच्या क्षणीसुद्धा त्यांचा मैत्रीचा दरवळ कायम होता. त्यांच्या दुर्दैवी बातमीने पंचक्रोशीत हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

जीवनाच्या अखेरच्या क्षणीसुद्धा मैत्रीचा दरवळ कायम

ऋणमुक्तेश्‍वर सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष जगन तुळशीराम परदेशी (वय ७५) यांचे अल्प आजाराने दोन दिवसांपूर्वी मालेगाव येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. सामाजिक कार्यकर्ते संदीप परदेशी यांचे ते वडील होते. दरम्यान, मित्राच्या निधनामुळे पतसंस्थेचे उपाध्यक्ष तथा माजी ग्रामपंचायत सदस्य सदाशिव वंजी सोनवणे (वय ७८) यांना मानसिक धक्का बसला होता. रविवारी (ता. ६) सकाळी अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु उपचारादरम्यान त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.

हेही वाचा>> उच्चशिक्षित दिव्यांग रामेश्वरचा संघर्ष! रेल्वे बंदमुळे फरफट; प्रशासकीय सेवेत अधिकारी बनायचे स्वप्न 

अख्खे गाव हळहळले

सामाजिक व सहकार क्षेत्रात नावलौकिक मिळविणाऱ्या येथील दोन जिवलग मित्रांचे अवघ्या दोन दिवसांच्या अंतराने निधन झाल्याने अख्खे गाव हळहळले आहे. जीवनाच्या अखेरच्या क्षणीसुद्धा त्यांचा मैत्रीचा दरवळ कायम होता. येथील ऋणमुक्तेश्‍वर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेला ऊर्जितावस्थेत आणण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. 

हेही वाचा >> एकुलत्या एक लेकाची जेव्हा निघाली अंत्ययात्रा; मटाणे गावावर शोककळा

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रा. गुलाबराव कापडणीस, शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख जितेंद्र सूर्यवंशी, संभाजी सावंत, श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष भिका धोंडगे आदींनी श्रद्धांजली वाहिली. भाजपचे शहराध्यक्ष दीपक सोनवणे, सामाजिक कार्यकर्ते विजय सोनवणे यांचे ते वडील, तर माजी सरपंच संजय सोनवणे यांचे काका होत.