११ जणांना डांबून ठेवणाऱ्या ‘त्या’ हॉटेलवर गुन्हा दाखल करा; बाळा दराडेंची पोलिस आयुक्तांकडे मागणी

इंदिरानगर (नाशिक) : पाथर्डी फाटा भागातील एका नामांकित हॉटेलमध्ये कथितरित्या डांबून ठेवलेल्या एका युवतीने शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते बाळा दराडे यांना फोन करून रडक्या व घाबरलेल्या आवाजात हॉटेल प्रशासने आम्हाला रात्री मारहाण केली असून, आम्हाला काम सोडून आमच्या गावी परत जायचे आहे अशी कैफियत मांडली होती.  त्यानंतर प्रकरण आता  चांगलेच तापताना दिसत आहे. 

डांबून ठेवलेल्या ११ युवक आणि युवतींची पोलिसांच्या मदतीने सुटका करणाऱ्या शिवसेनेच्या बाळा दराडे यांनी आता पोलिस आयुक्त दीपक पांडेय यांच्याकडे या हॉटेलची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी आज (ता.३) निवेदनाद्वारे केली आहे.

हेही वाचा - ही कसली स्टंटबाजी? पठ्ठ्याचे शेतात चक्क बिबट्यासोबत फोटोसेशन; VIDEO व्हायरल

परप्रांतीय असल्याने तक्रार नाही

फोनद्वारे आणि अनेक व्हीडिओ मेसेजद्वारे या विद्यार्थ्यांनी आपबिती जाहीर केले आहे. या हॉटेलवर दंडुक्याने मारहाण करणे, डांबून ठेवणे, असे गंभीर आरोप केले आहेत. त्यापैकी एका विद्यार्थिनीने तर दराडे यांच्याशी देखील संपर्क साधून आपली कैफियत मांडली होती. मात्र, परप्रांतीय असल्याने आणि दबावात असल्याने पोलिसांनी विचारल्यानंतर त्यांनी काहीही तक्रार नाही. घरी जायचे आहे, अशी भूमिका घेतल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. मात्र, मोठ्या प्रमाणात शंका उपस्थित होत असल्याने या प्रकरणाची चौकशी करून याबाबत योग्य कार्यवाही करण्याची मागणी दराडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. आता पोलिस आयुक्त या प्रकरणाबाबत काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. 
 

हेही वाचा - धक्कादायक! नाशिकच्या हॉटेलमधून ११ युवक-युवतींची सुटका; खोलीत डांबून व मारहाण झाल्याची चर्चा