इंदिरानगर : पुढारी वृत्तसेवा
चोरी अथवा फसवणुकीच्या प्रकरणातील मुद्देमाल मिळण्याचे प्रसंग तसे कमीच येत असतात. बँकेच्या लॉकरमध्ये १२ ताेळे सोन्याचे दागिने ठेवण्यासाठी निघालेली महिला दागिने रिक्षातच विसरली. मात्र, रिक्षाचालकाच्या प्रामाणिकपणामुळे ऐवज सुरक्षित परत मिळून सर्वांचाच जीव भांड्यात पडला.
सोनाली पोरजे या गुरुवारी (दि. २१) सकाळी साईबाबा मंदिरापासून कॉलेजरोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेतील लॉकरमध्ये दागिने ठेवण्यास गेल्या होत्या. परंतु, त्या रिक्षातच (एमएच १५ एफयू ९८९४) दागिने विसरल्या होत्या. हे लक्षात आल्यानंतर त्यांची तारांबळ उडाली. त्यांनी थेट इंदिरानगर पोलिस ठाणे गाठत दागिने गहाळ झाल्याची तक्रार नाेंदवली. या दरम्यान, रिक्षाचालक राहुल अशोक सुके हे एक बॅग घेऊन पोलिस ठाण्यात गेले. त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांच्याकडे बॅग सपूर्द केली. बॅगेच्या तपासणीत दागिने व बँकेची कागदपत्रं निघाली. त्यावरून महिलेचा शोध घेण्यात येऊन पोलिस उपायुक्त मोनिका राऊत यांच्या उपस्थितीत पोरजे यांना दागिन्यांसह बॅग परत करण्यात आली. रिक्षाचालकाला प्रामाणिकपणाबद्दल राऊत यांनी सन्मानपत्र देऊन सत्कार केला. याप्रसंगी शिवसेना विभागप्रमुख विनोद दळवी, सचिन राणे, रमाकांत क्षीरसागर, शिवा तेलंग, नीलेश राऊत, अशोक सुके, लक्ष्मण शिंदे उपस्थित होते.
पोरजे यांचे १२ तोळ्यांचे दागिने रिक्षात गहाळ झाले होते. ते रिक्षाचालक राहुल सुके यांनी प्रामाणिकपणे पोलिस ठाण्यात आणून दिले. त्यातील बँकेच्या कागदपत्रांवरून पोरजे यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. तेव्हा माजी नगरसेवक केशव पोरजे यांच्या माध्यमातून महिलेचा नंबर मिळवून त्यांना ऐवज सुपूर्द केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक शरमाळे यांनी सांगितले.
हेही वाचा:
- Arvind Kejriwal : केजरीवालांच्या अटकेनंतर शरद पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले, “भाजप सत्तेसाठी”
- नाशिक : चुंचाळे गावात आढळला पांढऱ्या रंगाचा भारद्वाज पक्षी
- जलस्रोतांची सुरक्षा रामभरोसे…
The post १२ ताेळे सोन्याचे दागिने गहाळ, महिला पोहोचली पोलिस ठाण्यात अन... appeared first on पुढारी.