नाशिक : पुढारी वृत्तसेवा- वडिलांच्या नावे असलेला निवासी गाळा तक्रारदाराच्या नावे करण्याच्या मोबदल्यात तक्रारदाराकडून ३ हजार रुपयांची लाच घेताना पकडलेल्या नाशिक गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाच्या वरिष्ठ लिपीकास न्यायालयाने चार वर्षे सक्तमजूरी व आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
कैलास भिकाजी शेळके (रा. पंचक, जेलरोड) असे लाचखोर लिपीकाचे नाव आहे. शेळके याने २२ मार्च २०१६ रोजी तक्रारदाराकडून लाच स्विकारली होती. अहमदनगर येथील तक्रारदाराच्या वडिलांच्या नावे असलेला गाळा स्वत:च्या नावावर करण्यासाठी अर्ज केला होता. त्यावेळी शेळके याने तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. त्यामुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार आल्यानंतर त्यांनी सापळा रचला. त्यात पंचासमोर लाचेची रक्कम स्विकारताना शेळके यास विभागाने पकडले. त्याच्याविरोधात मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी तत्कालीन पोलिस निरीक्षक बाळासाहेब बडे यांनी तपास करीत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सुनावणी झाली. शेळके विरोधात गुन्हा शाबित झाल्याने जिल्हा न्यायाधीश जे. एम. दळवी यांनी शेळके यास ४ वर्षे सक्तमजूरी व १० हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. सरकारी पक्षातर्फे अॅड. सचिन गोरवाडकर यांनी युक्तीवाद केला. या खटल्यात पोलिस निरीक्षक संदीप घुगे, हवालदार प्रदीप काळोगे व नाईक ज्योती पाटील यांनी कामकाज पाहिले.
हेही वाचा-