नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणूक निकालावरील याचिका अखेर मागे घेण्यात आली आहे. तत्कालीन उमेदवार तथा याचिकाकर्ते बापू बर्डे यांनी न्यायालयात अर्ज करून सदर याचिका मागे घेतली. त्यामुळे तब्बल पाच वर्षांपासून स्ट्राँग रूममध्ये बंदोबस्तात असलेले साधारणत: १८०० ईव्हीएम वापराचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दिंडोरीतून आठ उमेदवार रिंगणात होते. त्यावेळी प्रामुख्याने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, माकपा व वंचित अशी चाैरंगी लढत झाली. या लढतीत भाजपच्या डाॅ. भारती पवार यांनी बाजी मारली. तर वंचितकडून निवडणूक लढलेले बर्डे यांना चौथ्या पसंतीची मते मिळाली. मात्र, निवडणूक प्रक्रिया पार पडल्यानंतर बर्डे यांनी निकालाविरोधात न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. बर्डे यांनी दाखल केलेल्या याचिकेत विशिष्ट कालावधीनंतर ईव्हीएमवरील मतदान हे विशिष्ट पक्षाच्या उमेदवारालाच जात असल्याची तक्रार केली होती. या संदर्भात न्यायालयात नियमित सुनावण्यादेखील झाल्या. या दरम्यान दिंडोरी मतदारसंघाचे साधारणत: १८०० ईव्हीएम हे निवडणूक शाखेच्या स्ट्राँग रूममध्ये बंद करून ठेवण्यात आले. या कालावधीत ईव्हीएमची देखरेख व सुरक्षेवर प्रशासनाचा कोट्यवधींचा खर्च झाला. तसेच न्यायप्रविष्ट बाबीमुळे ईव्हीएमच्या वापरावर मर्यादा आल्या होत्या.
अठराव्या लोकसभेचा बिगुल वाजला असून, जिल्ह्यातील नाशिक व दिंडोरी मतदारसंघांत २० मे रोजी मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मध्यंतरीच्या काळात जिल्हा निवडणूक शाखेने निवडणूक आयोगामार्फत न्यायालयात अर्ज दाखल करत ईव्हीएम वापरासाठी परवानगी मागितली होती. त्याचवेळी प्रशासनाकडून बर्डेंचीही समजूत घालण्यात आली. प्रशासनाच्या या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. बर्डे यांनी न्यायालयातून त्यांची याचिका माघारी घेतली आहे. त्यामुळे प्रशासनानेदेखील सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
पोलिसांचा खडा पाहारा
२०१९ मध्ये दिंडोरी मतदारसंघ संदर्भातील निकालावरील याचिकेनंतर ईव्हीएम हे अंबड येथील केंद्रीय अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील स्ट्राँग रूमला जतन करण्यात आले. गोदामाभोवती पोलिसांचा २४ तास खडा पहारा तैनात होता. साधारणत: वर्षभरापूर्वी निवडणूक शाखेने न्यायालयात अर्ज करत सदरचे ईव्हीएम हे सय्यदपिंप्री येथील गोदामात स्थलांतरित केले होते.
हेही वाचा –
- श्रीमद् रामायण : सीता हरण प्रसंगात साधूच्या भूमिकेसाठी निकितीन धीरने अशी केली तयारी
- आता चंद्रावरही फिरता येईल कारमधून!
- नंदुरबार पोलीस दलाची कामगिरी, जिल्हयाभरात एकाचवेळी 44 आरोपींना अटक
The post २०१९ च्या निवडणूक निकालावरील दिंडोरी मतदारसंघाची याचिका मागे appeared first on पुढारी.