३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?

म्हसरूळ (नाशिक) : ‘तुमच्या शेतमालाला चांगले पैसे देतो’, असे म्हणून विश्वास संपादन करत देवळा तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्याची एका तोतया व्यापाऱ्याने फसवणूक केल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे.

कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?
मटाणे (ता. देवळा) येथील कांदा उत्पादक शेतकरी नानाजी निंबा साबळे (वय ५८) हे इजियाज अन्सारी याच्या सांगण्यावरून बुधवारी (ता. १८) सायंकाळच्या सुमारास पिक-अप वाहनात २९ क्विंटल ४५ किलो (६० गोण्या) कांदा विक्रीसाठी नाशिकमध्ये आले होते. त्या वेळी संशयिताने पंचवटीतील मालेगाव स्टॅन्ड येथे त्यांच्याशी चर्चा करून विश्वास संपादन करत पेठ रोडवरील शरदचंद्र पवार मार्केट यार्डात बोलावले. तेथे मुन्ना ट्रेडिंग कंपनीसमोर कांद्याबाबत दोघांमध्ये व्यवहार झाला. २७ रुपये किलो या दराने व्यवहार ठरल्यानंतरही संबंधिताने २० रुपये किलो या दरानेच ५८ हजार ५०० रुपये दिले जाईल, अशी हमी दिली. येथील एका गुदामात माल उतरविण्यात आला. बिलही बनविण्यात आले. 

हेही वाचा > मामाने वाचवले पण नियतीने हिरावले! चिमुकल्या जयाची मृत्युशी झुंज अपयशी

मात्र तोपर्यंत मालही गायब होता
या वेळी साबळे यांनी मालाचे पैसे मागितले असता, हा संशयित साबळे यांच्या वाहनात बसला व पुन्हा मालेगाव स्टॅन्ड येथे त्यांना घेऊन आला. त्याठिकाणी साबळे दांपत्याला चहा पाजला. नंतर मोबाइलवर बोलायचे नाटक करून त्याने पळ काढला. साबळे यांनी त्याला फोन केला, मात्र त्याचा मोबाइल बंद लागल्याने साबळे यांनी पुन्हा मार्केटमध्ये धाव घेतली. मात्र तोपर्यंत मालही गायब होता. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच साबळे यांनी रात्री उशिरा (ता. १९) पंचवटी पोलिस ठाण्यात धाव घेत संबंधित संशयितावर गुन्हा दाखल केला. याप्रकरणी वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भगत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कासर्ले तपास करीत आहेत. 

हेही वाचा > मोकाट कुत्र्याच्या तावडीत इवलेसे बिथरलेले पाडस; युवकांनी दिले जीवदान

पोलिस प्रशासनाने मला न्याय मिळवून द्यावा. केवळ फोनवरील बोलण्यावर विश्वास ठेवून दोन पैसे मिळतील, या आशेने आम्ही एवढा माल घेऊन आलो होतो. परंतु, इतका गोड बोलणारा तो एवढा भामटा असेल आणि आमची फसवणूक करेल, असे वाटले नव्हते. यात मार्केटमधील मुन्ना ट्रेडिंग कंपनीवाल्याचाही हात असल्याचा संशय आहे. -नानाजी साबळे, पीडित कांदा उत्पादक, देवळा  

गुन्हा दाखल

तोतया व्यापाऱ्याने शेतकऱ्यास २९ क्विंटल ४५ किलो कांद्याची रक्कम न देता माल घेऊन फरारी झाला. यासंदर्भात पंचवटी पोलिस ठाण्यात संशयित इजियाज अन्सारी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.