३६५ दिवस चालणारी हिवाळीची शाळा! अवलिया शिक्षकाची अद्‍भुत कामगिरी

मालेगाव कॅम्प (जि.नाशिक) : दुर्गम आदिवासी अशा वाट नसलेल्या गावात एका शिक्षकाने शिक्षणाची गंगा प्रवाहित केली. वर्षातील ३६५ दिवस सतत बारा तास चालणारी जिल्हा परिषदेची हिवाळी (ता. त्र्यंबकेश्वर) शाळा महाराष्ट्रात नावारूपाला आली आहे. हे केवळ साध्य झाले आहे ते अवलिया सर्जनशील शिक्षक केशव गावीत यांच्या अद्‍भुत कामगिरीमुळे..!. 

चिमुकले अधिकारी व्हावेत हीच या शिक्षकांची धडपड

हिवाळी येथील शाळा पहिली ते पाचवी असलेली अवघ्या ३२ पटाची मात्र गावित यांच्या कामगिरीमुळे आज सध्या बालवाडी ते बारावी ७६ विद्यार्थी येथे शिकत आहेत. केशव गावित बाबासाहेब उशीर या सहकारी शिक्षकाच्या मदतीने गुणवत्तेच्या टप्प्यावर पोचले आहेत. तंत्रज्ञानाच्या जमान्यात इथले चिमुकले अधिकारी व्हावेत हीच या शिक्षकांची धडपड. यासाठी या शिक्षकांनी अगदी बालवर्गापासून विद्यार्थ्यांना प्रवेश देत पाठांतर कौशल्य विकसित करून बोलके केले. इंग्रजीचे धडे गिरवत मनसोक्त आवडीनिवडीचे शिक्षण दिले. यामुळे मुले अध्यापन घटकावर आधारित स्पेलिंग एक तास आधी पाठांतर करतात. 

सुसज्ज, सुंदर शालेय आवार, विविध फुलांची झाडे, चौफेर पसरलेले लॉन, नटलेली हिरवळ विद्यार्थ्यांना प्रसन्न करतात. या सर्वांची निगा मुलेच राखतात. विविध शैक्षणिक साहित्याची निर्मिती मोठ्या मुलांनीच केली. साहित्य वर्गात लावण्याचे काम स्वतः करतात. वर्गातील फरशीवर ज्ञानरचनावाद, महामार्ग, रेल्वे-जलमार्ग विविध रंगांनी दर्शविले आहेत. स्वतंत्र रीडिंग रूम स्वतः हवे ते पुस्तक घेऊन वाचतात. 

आदिवासी पारंपरिक वस्तूंचा ठेवा, बांबू लाकडापासून बनविलेल्या अनेक वस्तूंचे प्रदर्शन मांडलेले आहे. स्पर्धा परीक्षा दोन तास स्पेशल वर्ग, शिष्यवृत्तीत शंभर टक्के विद्यार्थी गुणवत्ता यादीमध्ये आले. संपूर्ण गावातील घरांना हिरवा रंग दिला. घराच्या भिंतीवर मुलीच्या नावाची पाटी, संदेश देणारी चित्रे, ‘आधी विद्यादान, मग कन्यादान’ अशी सुवचने रेखाटली आहेत. 

हेही वाचा - क्रूर नियती! नातेवाईकांसोबत गणेशचे ते फोटो सेशन ठरले शेवटचे; घटनेने परिसरात हळहळ

वृक्षलागवडीत गावासह परिसरातील ३० गावांचा सहभाग आहे. गुरुजी ग्रामस्थांच्या रोजगारासह शेतीविषयक मार्गदर्शन, कार्यशाळा सामाजिक संस्थेच्या मदतीने यशस्वी करतात. शंभर मुलांना गिव्हतर्फे वर्षभर रात्रीचे मोफत जेवण दिले जाते. परिणामी विद्यार्थी वर्षभर नियमितपणे शाळेत येतात. कोरोनाच्या काळात सातत्याने शिक्षण टेकडीवर सुरू आहे. दहा हजार शिक्षकांसह चार हजार पालकांनी भेट दिली आहे. 

हेही वाचा - खेळ कुणाला दैवाचा कळला! लेकराचं तोंड बघायच्या आधीच वडिल देवाला प्रिय; गावात भयाण शांतता

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, राजीव म्हसकर, एल. डी. सोनवणे, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाठ, भास्कर कनोज, विस्ताराधिकारी आर. आर. बोडके यांचे मार्गदर्शन ऊर्जादायी आहे. 

‘गिव्ह’चे पालकत्व 
गिव्ह संस्थेच्या माध्यमातून अध्यक्ष रमेश अय्यर यांनी गावच दत्तक घेतले. गावातील घरे दुरुस्ती, रंगरंगोटी, स्वच्छता, आरोग्यावर भर देत आहे. 

शाळेतील उपक्रम : 
विषयानुरूप, बौद्धिक क्षमतेचे अध्यापन, स्पेलिंग अभ्यासवर्ग, समग्र अंकगणित, मराठी व्याकरण, राज्यघटना अभ्यास, सामान्य ज्ञान विशेष, दहावी विशेष तयारी, बुधवारी कार्यानुभव व कौशल्य विकास, रूनिक क्यूब, ॲबॅकस तयारी, संगणक तास, खेळू या आनंदे, साप्ताहिक चाचणी, सांस्कृतिक कार्यक्रम. 

स्वप्नाला सत्यात उतरविण्यासाठी धडपड आहे. देशपातळीवर हिवाळीची लेकरे गुणवंत होतील हाच दिवस आयुष्यातील सोनेरी क्षण असेल. आयएएस अधिकारी घडविण्याचे ध्येय ठेवून काम करतोय. -केशव गावित, शिक्षक. 

हिवाळी शाळा अनुसरण करण्यासाठी इतर शासकीय शाळांना प्रेरणादायक उदाहरण देऊ शकतात. श्री. गावित यांच्यासारख्या 
समर्पित शिक्षकांमुळे काहीही अशक्य नाही. -विशाल सोळंकी, शिक्षण आयुक्त