३ लाख शेतकऱ्यांचे कांदा अनुदान होणार जमा, छगन भुजबळ यांची माहिती

छगन भुजबळ,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, ३ लाख ३६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर ४६५.९९ कोटींचे कांदा अनुदान जमा होणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

ना. भुजबळ म्हणाले की, राज्याच्या पणन विभागाचे सहसचिव डॉ. सुग्रीव धपाटे यांच्याशी कांदा अनुदानाबाबत चर्चा करून अनुदान वितरण करण्याबाबत माहिती घेतली असून, त्यानुसार ४६५.९९ कोटीची रक्कम वित्त विभागाने पणन विभागाला वर्ग केली आहे. येत्या दोन-तीन लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे. तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचा शासनाने यापूर्वीच निर्णय घेतलेला होता. राज्यातील सुमारे ३ लाख ३६ हजार ४०० शेतकऱ्यांसाठी ८४४ कोटी रुपये अनुदान अपेक्षित होते. त्यापैकी पुरवणी अर्थसंकल्पात ५५० कोटींची मागणी मंजूर करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वित्त विभागाने ४६५.९९ कोटींचा निधी वितरित केला आहे. अजूनही ३७८ कोटी निधी आवश्यक आहे. उर्वरित निधी लवकरच आकस्मिक खर्चातून किंवा डिसेंबर २०२३ च्या पुरवणी अर्थसंकल्पातून दिला जाईल, असेही ते म्हणाले. एकट्या नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर १ लाख ७२ हजार शेतकऱ्यांसाठी ४३५ कोटी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

येवल्यात नाफेडतर्फे कांदा खरेदी सुरू

नाशिक जिल्ह्यात नाफेड संस्थेच्या वतीने कांदा खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहे. यामध्ये येवला तालुक्यातील शेतकऱ्यांनी कांदा विक्रीस आणावा. यासाठी नाफेडचे अधिकारी निखिल पाडाडे यांच्याशी चर्चा करून सूचना केल्या असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post ३ लाख शेतकऱ्यांचे कांदा अनुदान होणार जमा, छगन भुजबळ यांची माहिती appeared first on पुढारी.