५१६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती; स्थायी समितीचा निर्णय

नाशिक : महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वैद्यकीय व आरोग्य कर्मचाऱ्यांची भरती केल्यानंतर त्यांना मुदतवाढ देण्याबरोबरच वैद्यकीय सेवा अधिक सक्षम करण्यासाठी ५१६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मानधनावर भरती करण्याचा निर्णय शुक्रवारी (ता. 29) घेण्यात आला आहे. 

 

महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये अपुरे मनुष्यबळ असल्याने रुग्णांची हेळसांड होते. पायाभूत सुविधा पुरविल्या जात असल्या तरी मनुष्यबळ नसल्याने पूर्ण क्षमतेने उपचार होत नाही. कोरोना काळात महापालिकेने मानधनावर वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती केली. परंतु, त्यांची मुदत संपल्याने रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी नसल्याची बाब सुप्रिया खोडे व समिना मेमन यांनी स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मांडली. त्यानुसार वैद्यकीय विभागाने सविस्तर अहवाल सादर केला. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये सध्या ६६ डॉक्टर्स कार्यरत असून, यात ४७ कायम, ४ मानधनावर, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत १४ डॉक्टरांचा समावेश आहे. त्याव्यतिरिक्त ४३ डॉक्टरांची गरज आहे. 

५१६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता

रुग्णालयांमध्ये डॉक्टरांव्‍यतिरिक्त ४३८ कायम, मानधनावरील १२८ तर राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १९६ डॉक्टर्स असे १,४७७ वैद्यकीय कर्मचारी कार्यरत आहे. त्याव्यतिरिक्त ५१६ वैद्यकीय कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्याची बाब वैद्यकीय अधिक्षक डॉ. बापूसाहेब नागरगोजे यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ४३ वैद्यकीय अधिकाऱ्यांना तीन वर्षे तर, अन्य कर्मचाऱ्यांना सहा महिन्याच्या मुदतीवर मानधनावर नियुक्ती करण्याच्या सूचना स्थायी समिती सभापती गणेश गिते यांनी दिल्या. 

हेही वाचा > सिनेस्टाइल पाठलाग! खंडणीची मागणी करणारा पोलीसांकडून ट्रेस; पोलिसांत गुन्हा दाखल

आठवडाभरात जाहिरात होणार प्रसिध्द

तातडीने भरती करण्याचे आदेश स्थायी समितीने शुक्रवारी (ता. २९) प्रशासनाला दिले. वैद्यकीय अधिकाऱ्यांची तीन वर्षांकरीता तर परिचारिका, आया, वॉडबॉय यासारख्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची सहा महिन्यांकरीता मानधनावर भरती केली जाणार असून त्यासाठी आठवडाभरात जाहिरात प्रसिध्द करण्याचे निर्देश सभापती गणेश गिते यांनी वैद्यकीय विभागाला दिले आहेत.  

हेही वाचा > हॉटेल मालकाने बळजबरीने ग्राहकाकडून घेतला ८० हजारांचा ऐवज; मालकावर गुन्हा दाखल