नाशिक : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या तीनशेहून अधिक राहिली. शनिवारी (ता. २१) दिवसभरात ३१९ बाधित आढळून आले. तर, २५२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. जिल्ह्यात सहा रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ॲक्टिव्ह रुग्णसंख्येत ६१ ने वाढ झाली असून, सद्यःस्थितीत दोन हजार ५५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आढळले ३१९ बाधित, २५२ कोरोनामुक्त
शनिवारी आढळलेल्या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक शहरातील १८०, नाशिक ग्रामीणमधील १३१, मालेगावचे तीन, तर जिल्हाबाह्य पाच रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये नाशिक शहरातील १८८, नाशिक ग्रामीणमधील ५६, मालेगावचे तीन, तर जिल्हाबाह्य पाच रुग्णांचा समावेश आहे. सहा मृतांमध्ये नाशिक शहरातील एक आणि ग्रामीण भागातील पाच रुग्णांचा समावेश आहे. यात येवला तालुक्यातील ६५ वर्षीय पुरुष, पाडळी (ता. सिन्नर) येथील ६५ वर्षीय महिला, मनमाड येथील ६५ वर्षीय पुरुष, लहवित येथील ६१ वर्षीय पुरुष, लोहशिंगवे (ता. नाशिक) येथील ५२ वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरातील जेल रोड भागातील ६८ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची नोंद आहे.
हेही वाचा > लिफ्ट देण्याच्या बहाण्याने करायचे लूटमार; मुंबईतील संशयिताच्या नाशिक पोलिसांनी आवळल्या मुसक्या
सायंकाळी उशिरापर्यंत चार हजार ३० अहवाल प्रलंबित
दरम्यान, जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ९८ हजार ३९६ वर पोचली असून, यापैकी ९४ हजार ७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत एक हजार ७६१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात नाशिक महापालिका रुग्णालये व गृहविलगीकरणात एक हजार ३०२ संशयित रुग्ण दाखल झाले आहेत. तर नाशिक ग्रामीण रुग्णालये व गृहविलगीकरणात ७१, मालेगाव रुग्णालयांत एक, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात पाच आणि जिल्हा रुग्णालयात सात रुग्ण दाखल झाले आहेत. प्रलंबित अहवालांची संख्या आता चार हजारांहून अधिक झाली आहे. सायंकाळी उशिरापर्यंत चार हजार ३० अहवाल प्रलंबित होते. यापैकी नाशिक ग्रामीणमधील दोन हजार ६८९, नाशिक शहरातील एक हजार १४१, मालेगाव महापालिका हद्दीतील दोनशे रुग्णांना अहवालाची प्रतीक्षा आहे.
हेही वाचा > ३० क्विंटल कांदा घेऊन तोतया व्यापारी फरारी; कधी थांबणार शेतकऱ्याची फसवणूक?