ॲप, संकेतस्थळावर मिळणार साहित्‍य संमेलनाची माहिती; प्रत्‍येक घडमोडींचे अपडेट्‍स  

नाशिक : अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनासाठी अन्‍य ठिकाणांहून येणारे साहित्‍यिक, रसिकांना संमेलनस्‍थळाचा नकाशा अन्‌ अन्‍य उपयुक्‍त माहिती देण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन व संकेतस्‍थळ विकसित केले जात आहे. दोन-तीन दिवसांत सोशल मीडियाद्वारेदेखील संमेलनाच्‍या प्रत्‍येक घडमोडींचे अपडेट्‌स दिले जाणार आहेत. 

प्रत्‍येक घडमोडींचे अपडेट्‌स
सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग समितीची बैठक रविवारी (ता. १४) झाली. समितीप्रमुख हेमंत बेळे, सुमित गोखले, मिथिलेश मांडवगणे, अभिजित अष्टेकर, आदित्‍य नाखरे, अमोल जोशी यांच्‍यासह मुख्य समन्‍वयक विश्‍वास ठाकूर उपस्‍थित होते. ॲप व संकेतस्‍थळावर संमेलनाच्‍या ठिकाणी विविध मार्गांवरून येताना आवश्‍यक नकाशे उपलब्‍ध करून दिले जाणार आहेत. याशिवाय मुख्य व्‍यासपीठ, पुस्‍तक प्रदर्शन, प्रसाधनगृह याबद्दलचे नकाशे व मार्गदर्शक व्‍हिडिओ स्‍वरूपात माहिती उपलब्‍ध केली जाणार आहे. याशिवाय सोशल मीडियाद्वारे तीन-चार दिवसांत संमेलनाचे सर्व अपडेट्‌स दिले जातील. यानिमित्त विविध माध्यमांतून संमेलनाशी निगडित सेलिब्रिटीज्‌, ज्‍येष्ठ साहित्‍यिकांचा संवाद घडवून आणला जाणार आहे. 

हेही वाचा - दोन वर्षांपासून बेपत्ता प्रेमीयुगुलाचा दुर्दैवी शेवट! 'व्हॅलेंटाईन डे'पुर्वी झोपडीत आढळले मृतदेह

पर्यटनस्‍थळांची माहिती देणार 
मोबाईल ॲप्लिकेशन अँड्रॉईड आणि आयओएस अशा दोन्‍ही प्‍लॅटफॉर्मवर उपलब्‍ध असणार आहे. या ॲप, संकेतस्‍थळावरून साहित्‍य संमेलनासोबतच नाशिकमधील पर्यटनस्‍थळांची माहितीही दिली जाणार आहे. त्‍यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहकार्य घेतले जाईल. यातून संमेलनानिमित्त आलेल्‍या साहित्‍यिक व रसिकांना पर्यटनाची संधी उपलब्‍ध करून दिली जाणार असल्‍याचे बेळे यांनी सांगितले.  

हेही वाचा -  नाशिकच्या शासकीय रुग्णालयातून दीड वर्षाच्या चिमुरडीला पळविले; घटना CCTV मध्ये.