अडीच वर्ष कायद्याचा उच्छाद मांडणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे

विखे पाटील, उद्धव ठाकरे,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मागील अडीच वर्षांच्या सत्ताकाळात महाविकास आघाडी सरकारने बेकायदेशीरपणे अनेकांवर कारवाई केली. अनेकांवर देशद्रोहाचे आरोप लावले. त्यामुळे भाजपकडे बोट दाखवण्यापेक्षा गेली अडीच वर्ष कायद्याचा उच्छाद मांडणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उध्दव ठाकरे यांना दिला आहे.

ना. विखे पाटील शुक्रवारी (दि.१४) नाशिक दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. शिवसेनेतून ४० आमदारांच्या बंडखोरीपासून ते अंधेरी येथील पोटनिवडणुकीच्या प्रकरणात भाजपकडून राजकीय दबाव टाकून गैरवापर केला जात असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर ना. विखे पाटील यांनी उध्दव ठाकरे यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला दिला आहे. ठाकरे हे केवळ सल्लागारांच्या (राष्ट्रवादी काँग्रेसकडे रोख करत) सल्ल्याने काम करत असल्याचे सांगत सत्तेचा दुरूपयोग महाविकास आघाडी सरकारच्या काळात सर्वाधिक करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. औरंगजेबच्या कबरीवर डोक टेकवणाऱ्यांचा सत्कार केला जातो. हनुमान चालीसा आणि देशाविषयी अभिमान बाळगणाऱ्यांवर याच सरकारने गुन्हे दाखल केल्याची आठवणही त्यांनी करून दिली.

जबाबदारी ताकदीने पेलेल

नाशिक महापालिकेच्या निवडणुकीसाठी नाशिकमधील भाजपचे सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते सक्षम आहेत. निवडणुकीत माझ्याकडे पक्ष देईल ती जबाबदारी आपण पूर्ण ताकदीने पेलण्यास समर्थ असल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगत मनपाच्या आगामी निवडणुकीकडेही लक्ष वेधले. यावेळी भाजपचे महानगरप्रमुख गिरीश पालवे, आमदार डॉ. राहूल आहेर, माजी महापौर सतीश कुलकर्णी, जगन पाटील आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

The post अडीच वर्ष कायद्याचा उच्छाद मांडणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावे appeared first on पुढारी.