अमित शहा यांच्या दौऱ्यात अनधिकृतपणे वावरणारा हेमंत पवार धुळे जिल्ह्यातील दाऊळ येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट

अमित शहा

धुळे, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या मुंबई येथील दौऱ्यात अनधिकृतपणे वावरणारा हेमंत पवार हा धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ या गावातील मूळ रहिवासी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पवार याचे दिल्ली येथेच वास्तव्य असल्याची माहिती देखील पुढे आली आहे. धुळे जिल्ह्यात हेमंत पवार यांच्या विरोधात कोणताही गुन्हा दाखल नसल्याचे देखील सांगण्यात येते आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा नुकताच मुंबई दौरा पार पडला. या दौऱ्यात संशयितपणे वावरणाऱ्या एका व्यक्तीला मुंबई येथील पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला अटक केली. प्राथमिक तपासामध्ये त्या व्यक्तीचे नाव हेमंत पवार असून तो धुळे जिल्ह्याचा रहिवासी असल्याची माहिती पुढे आली. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दाऊळ या गावातील हेमंत पवार हा मूळ रहिवासी असून त्याचे वडील डाक विभागातून सेवानिवृत्त झाले आहेत. तर पवार यांची आई गृहिणी आहे. पवार कुटुंब हे सर्वसाधारण कुटुंब असून हेमंत पवार यांने २०१० मध्ये दोंडाईचा येथेच यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या माध्यमातून बी.ए. ची पदवी घेतली. यानंतर त्याने २०१४ पर्यंत पुणे येथील एका कॉल सेंटरमध्ये नोकरी देखील केली. यानंतरच्या कालावधीत २०१५ पर्यंत खासदार दिलीप गांधी यांचे स्वीय सहाय्यक म्हणून देखील त्यांनी सेवा बजावल्याची माहिती सांगितली जाते आहे.

आंध्र प्रदेशातील खासदार चिंता अनुराधा यांचे ते खाजगी सचिव असल्याचे ओळखपत्र त्यांच्याकडून आढळून आले आहे. दरम्यान, हेमंत पवार यांचे अनेक बडे नेत्यांसमवेत फोटो असल्याची माहिती सांगितली जाते आहे. यात भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच मुख्यमंत्री मनोहरलाल कट्टर ,महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेत्यांबरोबर असलेले फोटो पवार यांच्याकडे असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरीही धुळे जिल्ह्यात हेमंत पवार यांची पार्श्वभूमी गुन्हेगारी नसल्याची देखील माहिती आहे. जिल्ह्यातील कोणत्याही पोलीस ठाण्यात दखलपात्र किंवा अदखलपात्र असा कोणताही गुन्हा त्यांच्या विरोधात दाखल नसल्याची माहिती पोलीस प्रशासनाच्या वतीने देण्यात येते आहे.

हेही वाचलंत का?

The post अमित शहा यांच्या दौऱ्यात अनधिकृतपणे वावरणारा हेमंत पवार धुळे जिल्ह्यातील दाऊळ येथील रहिवासी असल्याचे स्पष्ट appeared first on पुढारी.