Site icon

अरे बाप रे…रुग्णाच्या पोटातून काढला नारळाच्या आकाराचा मुतखडा

धुळे : पुढारी वृत्तसेवा
शहरातील डॉ. आशिष पाटील यांनी जटिल शस्त्रक्रियेच्या आधारे आदिवासी शेतकर्‍याच्या मूत्राशयातून तब्बल एक किलो वजनाचा नारळाच्या आकाराचा मुतखडा काढला. डॉ. पाटील यांच्या या कामगिरीसाठी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डने त्यांना सन्मानित केले आहे. भारतात इतक्या मोठ्या आकाराचा मुतखडा पहिल्यांदाच काढण्यात आल्याची माहिती डॉ. पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आदिवासी शेतकर्‍याचे प्राण वाचले.

या संदर्भात माहिती देताना डॉ. पाटील यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्ह्यातील पाटोळी येथील पन्नास वर्षीय शेतकरी रमण चौरे यांना गेल्या काही महिन्यांपासून वारंवार लघवीचा त्रास होत होता. त्यांनी धुळे येथील तेजनक्ष फाउंडेशनमध्ये येऊन तपासण्या केल्या होत्या. तपासणी अहवालामध्ये रुग्णाच्या ब्लॅडरमध्ये मोठा खडा असल्याचे लक्षात आल्याने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रिया करीत असताना हा खडा ब्लॅडरच्या हाडांमध्ये रुतून बसल्याचे लक्षात आले. त्यामुळे हा खडा त्या हाडातून बाहेर काढताना 20 ते 25 मिनिटे आमचे वैद्यकीय कसब पणाला लागले होते. चौरे यांची सखोल आरोग्य तपासणी केली असता, त्यांना मूतखड्यामुळे अन्य कोणताही गंभीर आजार झाला नसल्याची बाब डॉ. पाटील यांनी स्पष्ट केली.

चौरे यांच्या मूत्राशयातून काढण्यात आलेल्या मूतखड्याचा आकार 12.5 बाय 12.75 सेंटीमीटर असून, हा भारतातील आजवरचा सर्वात मोठा मूतखडा असल्याचे डॉ. पाटील यांनी सांगितले आहे. सर्वात मोठा मूतखडा शस्त्रक्रिया करून बाहेर काढण्याचा विक्रम याआधी डॉ. पाटील यांच्याच नावावर होता. त्यांना आतापर्यंत दोन गिनीज बुक ऑफ रिकॉर्ड, दोन लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड, दोन एशिया बुक ऑफ रेकॉर्ड यासह 21 आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.

लघवीसंदर्भात घरगुती उपचार टाळून तातडीने तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे. मूत्ररोगातील खडा लहान असतानाच त्याच्यावर योग्य उपचार झाल्यास रुग्णाचा त्रास कमी होऊ शकतो. मात्र, तसे न झाल्यास कर्करोगासारख्या गंभीर आजाराला सामोरे जाण्याची वेळ येऊ शकते.
-डॉ. आशिष पाटील

हेही वाचा :

The post अरे बाप रे...रुग्णाच्या पोटातून काढला नारळाच्या आकाराचा मुतखडा appeared first on पुढारी.

Exit mobile version