आधार लॉक-अनलॉक कसे करावे?

adhar www.pudhari.news

नाशिक : दीपिका वाघ

डिजिइन्फो

बँक अकाउंट, पॅनकार्ड व इतरही माहिती बर्‍याच ठिकाणी आधारशी जोडली गेलेली असल्याने ती माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हातात गेल्यास त्याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो. आधारकार्डशी संबंधित बायोमॅट्रिक चोरून अनेक आर्थिक घोटाळे, व्यक्ती प्रत्यक्षात उपस्थित नसली, तरी आधारमधून माहिती चोरणे, जमिनीच्या कागदपत्रांवरून अंगठ्याचे ठसे चोरणे, रबराचा उपयोग करून नकली ठसे तयार करणे वगैरे… अशा अनेक घटना बातम्यांमधून समोर आल्या आहेत. त्यापासून बचाव कसा करायचा… तर त्यासाठी आधारकार्ड लॉक करण्याचा पर्याय असतो.

आधी व्हीआयडी नंबर तयार करावा लागेल. आधारची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी आधार लॉक करता येते आणि जेव्हा गरज वाटेल, तेव्हा अनलॉक करता येते. त्यासाठी 16 अंकी व्हीआयडी (व्हर्च्युअल आयडी) नंबर असणे गरजेचे असते. आधार क्रमांक 12 अंकी असतो, तर व्हीआयडी 16 अंकी हे लक्षात घ्यायला हवे. आता व्हीआयडी नंबर नसेल, तर तो एसएमएस किंवा वेबसाइटवरून तयार करता येतो.

आधार लॉक / अनलॉक कसे करावे?
यूआयडीएआयच्या uidai.gov.in वेबसाइटवर जा. तिथे माय आधार विंडो दिसेल, त्यावर क्लिक करा. आधार सर्व्हिस विंडोमध्ये लॉक / अनलॉक बायोमॅट्रिक असा पर्याय दिसतो. त्यावर क्लिक केल्यानंतर आधार नंबरवर व्हीआयडी टाका. (तिथे क्लिक हिअर टू जनरेट व्हीआयडी असा पर्याय दिसतो) कॅप्चा टाकून ओटीपी नंबर मिळविण्यासाठी क्लिक करा. त्यानंतर बायोमॅट्रिक माहिती लॉक केली जाईल. गरज पडल्यावर आधार अनलॉक करायचे झाल्यास तिथे लॉकऐवजी आता अनलॉक पर्याय दिसेल. अनलॉक पर्यायावर क्लिक करून ओटीपी टाकून आधार पुन्हा अनलॉक करता येते. लॉक करण्याची जी प्रोसेस असते, तीच प्रोसेस अनलॉक करण्याचीही असते. त्यामुळे आजच आधार लॉक करा आणि फसवणुकीपासून स्वत:ला वाचवा.

The post आधार लॉक-अनलॉक कसे करावे? appeared first on पुढारी.