आमदार एकनाथ खडसे : जळगावातील रस्त्यांसाठी आंदोलन करणार

खड्डे www.pudhari.news

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

शहरातील नेहमीचा वर्दळीचा रस्ता असलेल्या शिवतीर्थ मैदान ते गणेश कॉलनी रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी (दि.११) माजी मंत्री आ.एकनाथ खडसे यांनी रस्त्याच्या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी शहरातील खराब रस्त्यांबाबत नाराजी व्यक्त केली. याचबरोबर पालकमंत्री गुलाबराव पाटील व मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली.

याप्रसंगी त्यांच्या सोबत महापौर जयश्री महाजन, मनपा आयुक्त डॉ. विद्या गायकवाड, राष्ट्रवादीचे महानगराध्यक्ष अशोक लाडवंजारी, महिला महानगराध्यक्षा मंगला पाटील, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जळगाव शहरातील रस्त्यांच्या कामासाठी मिळालेल्या निधीतून वर्ष झाले तरी अद्याप कामे पूर्ण झालेली नाही. माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी वर्षभरात जळगाव बदलण्याचा शब्द दिला होता. परंतु तसे काही झाले नाही. सध्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील कामाकडे लक्ष देत नाहीत. अशावेळी याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचा टोमणा देखील आ. खडसे यांनी लगावला आहे. याचबरोबर सुरेश जैन यांच्या विरोधात मी संघर्ष केला. मात्र त्यांच्या काळात काम निकृष्ट होत नव्हते. परंतु आज होणारी कामे निकृष्ट असल्याचे दिसून येत आहेत.

डांबर न वापरता रस्त्यांचे काम…

शहरात एकही रास्ता नाही ज्यावर खड्डा नाही. नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. शहरातील रस्त्यांसाठी एक वर्षाच्या आधी वर्कऑर्डर मिळाली असली तरी आज कामे होत आहेत. ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असून यात डांबर न वापरता काम होत असल्याचा गंभीर आरोप आ. एकनाथ खडसे यांनी केला. याप्रकरणी विधानपरिषदेत प्रश्‍न उपस्थित करणार असून राष्ट्रवादीतर्फे यासाठी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला.

हेही वाचा:

The post आमदार एकनाथ खडसे : जळगावातील रस्त्यांसाठी आंदोलन करणार appeared first on पुढारी.