आमदार डॉ. राहुल आहेर : नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पास मान्यता मिळणार

आमदार डॉ. राहुल आहेर www.pudhari.news

नाशिक (देवळा) : पुढारी वृत्तसेवा
नाशिक व जळगाव जिल्ह्याला वरदान ठरणार्‍या नार – पार गिरणा नदीजोड प्रकल्पास येत्या दोन महिन्यात मान्यता देण्यात येईल. त्यासाठी आठ हजार कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. विधानसभेत आमदार डॉ. राहुल आहेर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी उपरोक्त माहिती दिली.

आमदार डॉ. आहेर यांनी, महाराष्ट्राच्या पश्चिमेला जे 40 टीएमसी पाणी वाहून जाते, परंतु आताच्या डिपीआरमध्ये 10 टीएमसी पाणी वळविण्याचे प्रयोजन करतो आहे, ते आपण वाढवणार का? गोदावरी खोर्‍याला जे पाणी वाळवायचे आहे, त्याचे समावेशन करणार का, चांदवड – देवळा तालुक्यांसाठी हायराईज कॅनालचा समावेशन करणार का, सर्व लोकप्रतिनिधींची बैठक मंत्रालयात घेणार का, अशी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उपमुख्यमंत्री फडणवीस उतर देताना, नार -पार गिरणा नदीजोड योजनेमुळे नाशिक व जळगाव जिल्ह्यातील 58 हजार 761 हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ मिळणार आहे. यासाठी साधारणत:  हजार कोटींचा निधी राज्य शासन खर्च करणार असून या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे. येत्या दोन महिन्यात या संदर्भातील सर्व मान्यता मिळून मंत्री उपसमिती आणि मंत्रिमंडळ बैठकीतही त्यास मान्यता येईल, असे सांगितले. नार, पार, औरंगा व आंबिका या चार पश्चिमी वाहिनी नद्या महाराष्ट्र राज्यात उगम पावून पश्चिमीकडे वाहत जावून अरबी समुद्राला जाऊन मिळतात, हे अतिरिक्त पाणी उपसा करून पूर्वेकडील अती तुटीच्या गिरणा उपखोर्‍यात शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्च सोडविण्यासाठी ही योजना प्रस्तावित केली आहे. एकात्मिक राज्य जल आराखड्यातील तरतुदीनुसार नार पार औरंगा व आंबिका या पश्चिमी वाहिनी नदी खोर्‍यातील 304.6 दलघमी पाणी नार पार गिरणा नदी जोड योजनेमुळे वळविण्याचे नमूद आहे. या योजनेमध्ये नऊ धरणे प्रस्तावित आहेत. मानखेडे, सालभोये, मांजरपाडा या तीन लिंकद्वारे 260.30 दलघमी पाणी उर्ध्वगामी नालिकेद्वारे उपसा करून चणकापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सोडण्याचे प्रस्तावित असून पुढे 79.92 किमी लांबीच्या प्रवाही बंद नलिकेद्वारे सिंचन करणे आहे. त्याचा लाभ नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा, कळवण, देवळा, मालेगाव व जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, भडगाव, पारोळा या तालुक्यातील एकूण 58 हजार 761 हेक्टर क्षेत्राला मिळणार आहे. या प्रकल्पामुळे देवळा तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याची माहिती आमदार डॉ. आहेर यांनी दिली.

हेही वाचा:

The post आमदार डॉ. राहुल आहेर : नार-पार गिरणा नदीजोड प्रकल्पास मान्यता मिळणार appeared first on पुढारी.