आमदार सुधीर तांबे : वाचन चळवळ वाढीसाठी ग्रंथोत्सव महत्त्वाचा

ग्रंथदिंडी www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

वाचनाने माणसाची आकलन, स्मरणशक्ती व संशोधकवृत्ती वाढते. वाचन चळवळ वाढीसाठी ग्रंथोत्सव आवश्यक असून ग्रंथालय चळवळ रुजण्यासाठी ग्रंथालयाना आवश्यक ती मदत करण्याबरोबरच ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय धुळे ग्रंथोत्सव-2022 चे उद्धाटन गुरुवारी (दि.23) ग्रंथभवन, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धुळे येथे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यांनतर मान्यवरांच्या हस्ते ग्रंथोत्सव ठिकाणी ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. धुळे महापालिकेच्या उपायुक्त संगीता नांदूरकर या अध्यक्षस्थानी होत्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव समितीचे अध्यक्ष जलज शर्मा, माजी आमदार प्रा. शरद पाटील, ज्येष्ठ साहित्यिक रामदास वाघ, रमेश बोरसे, सुभाष अहिरे, श्रावण वाणी, संयोजन समितीचे सदस्य विलास बोडके, डॉ. शशिकला पवार, डॉ. दत्ता सूर्यवंशी, प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी, प्रकाश पाटील, सदस्य सचिव तथा जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील आदी उपस्थित होते.

ग्रंथदिंडी www.pudhari.news
धुळे : ग्रंथोत्सवामुळे प्रेरणा व वाचनास ऊर्जा मिळण्यास प्रोत्साहन मिळण्यासाठी परिसरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली.

याप्रसंगी आ. डॉ. तांबे म्हणाले, माणसाच्या जीवनात ग्रंथाना अनन्य साधारण महत्व असल्याने ग्रंथ हे गुरु आहेत. वाचनाने माणसाची आकलन, स्मरणशक्ती व संशोधकवृत्ती वाढते. वाचन चळवळ वाढीसाठी ग्रंथोत्सव आवश्यक असून ग्रंथालय चळवळ रुजण्यासाठी ग्रंथालयाना आवश्यक ती मदत करण्याबरोबरच ग्रंथालय कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार प्रा. पाटील म्हणाले, ग्रंथ ही मानवी जीवन घडविणारी संपदा आहे. वाचनामुळे चांगली पिढी घडण्यास मदत होते. ग्रंथ भवनामुळे धुळे जिल्ह्याच्या लौकीकात भर पडल्याचे सांगून याचा जिल्ह्यातील तरुणांनी लाभ घेण्याचे आवाहन करुन अहिराणी भाषेचा सन्मान वाढण्यासाठी शहरात अहिराणी साहित्याचे दालन निर्माण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

जिल्हाधिकारी शर्मा म्हणाले, ग्रंथ हे सभ्यतेचे व संस्कृतीचे प्रमुख अंग आहे. वाचनासाठी वयाची मर्यादा नसते. लिखाणास व वाचनास जीवनात महत्व आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकांने दिवसातून किमान दहा पाने वाचनाचा संकल्प करावा. वाचनाबरोबरच नवीन लेखक तयार व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ग्रंथसंस्कृती जपण्यासाठी ग्रंथोत्सव महत्वपूर्ण असून या ग्रंथोत्सावाचा जिल्हावासियांना लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अध्यक्षस्थानावरुन नांदूरकर म्हणाल्या की, ग्रंथ हे गुरु असतात. वाचनाने मनुष्याच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवीत असतात. तरुणांनी सोशल मीडियाचा सुयोग्य वापर करीत असतानाच वाचनाकडे वळण्याची अपेक्षाही व्यक्त केली. त्याचबरोबर तरुण व होतकरु साहित्यिकांना ग्रंथोत्सवामुळे प्रेरणा व ऊर्जा मिळण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रंथदिंडी www.pudhari.news
धुळे : विद्यार्थ्यांनी आकर्षक पारंपरिक वेशभूषा परिधान केल्याने ग्रंथदिंडीचे हे आकर्षण ठरले.
ग्रंथदिंडी www.pudhari.news
ग्रंथ दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृंदूग, लेझीम, आदिवासी नृत्य सादर केले ( सर्व छायाचित्रे : यशवंत हरणे)

ग्रंथदिंडीतील विद्यार्थ्यांच्या वेशभूषा ठरल्या लक्षवेधी…

धुळे ग्रंथोत्सवाची सुरवात ग्रंथदिंडीने करण्यात आली. जयहिंद वरिष्ठ महाविद्यालय येथे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते ग्रंथपुजन करुन ग्रंथदिंडीस सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर जिल्हाधिकारी गोविंद दाणेज, ज्येष्ठ शाहीर लोक कलावंत श्रावण वाणी यांच्यासह संयोजन समितीचे सदस्य व विविध शाळा महाविद्यालयांचे शिक्षक उपस्थित होते. ग्रंथदिंडीत झुलाल भिलालीराव पाटील महाविद्यालय, जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूल, महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालय, आर. के. चितळे माध्यमिक विद्यालय, नानासो झेड. बी. पाटील हायस्कूल, एल. एम. सरदार ऊर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, कै. के. सी. अजमेरा हायस्कूल, उन्नती माध्यमिक विद्यालय, डॉ. जगन्नाथ वाणी केले विद्यालय, राजीव गांधी माध्यमिक विद्यालयाच्या 500 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ग्रंथ दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी टाळ, मृंदूग, लेझीम, आदिवासी नृत्य सादर केले तसेच विविध राष्ट्रपुरुषांच्या वेशभूषा केल्या होत्या.

ज्येष्ठ लोक कलावंत श्रावणी वाणी यांनी स्वागत गीत म्हटले. यावेळी ग्रंथाची प्रतिकृती बनविणारे शिक्षक तसेच ग्रंथोत्सवाच्या लोगोची आकर्षक रांगोळी रेखाटणारे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संयोजन समितीने मान्यवरांचे स्वागत केले. चंद्रशेखर ठाकूर यांनी प्रास्ताविक केले. वाहिद अली यांनी सुत्रसंचलन केले. डॉ. सदाशिव सुर्यवंशी यांनी आभार मानले. कार्यक्रमास जिल्यारातील मान्यवर साहित्यिक, लेखक, साहित्यप्रेमी नागरीक, विद्यार्थी, ग्रंथालयांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा:

The post आमदार सुधीर तांबे : वाचन चळवळ वाढीसाठी ग्रंथोत्सव महत्त्वाचा appeared first on पुढारी.