‘आयर्नमॅन’चे शहर म्हणून नाशिकची नवी ओळख

आयर्नमॅन www.pudhari.news

नाशिक :  अंजली राऊत- भगत

धार्मिकनगरी म्हणून ओळख असलेले नाशिक जस जसे वेगाने विकसित होत आहे तस तशी या शहराने वेगवेगळी ओळख निर्माण केली आहे. अलीकडेच या शहराने ‘आयर्नमॅन’चे शहर अशी नवी ओळख निर्माण केली आहे. जगभरातील विविध देशांमध्ये होणाऱ्या या अत्यंत आव्हानात्मक स्पर्धेत गत पाच वर्षांत २४ जणांनी ही स्पर्धा जिंकून नाशिकला तब्बल ३३ वेळा आयर्नमॅनचा किताब मिळवून दिला आहे.

अतिशय खडतर स्पर्धा म्हणून ‘आयर्नमॅन’ स्पर्धेची क्रीडाविश्वात ख्याती आहे. या स्पर्धेत शारीरिक क्षमतेचा अक्षरश: कस लागतो. क्रीडाविश्वातील अवघड समजल्या जाणार्‍या या स्पर्धेत आजवर नाशिकच्या २४ जणांनी ३३ वेळा आयर्नमॅनचा किताब पटकावत नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचविले आहे. यामध्ये डॉ. अरुण गचाळे, महेंद्र छोरिया आणि प्रशांत डबरी हे तिघे तीन वेळा आयर्नमॅन झाले आहेत. नाशिककडून तत्कालिन पोलीस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सर्वप्रथम ही स्पर्धा जिंकली आहे. त्यानंतर त्यांच्या कन्या रविजा सिंघल यांनीही ही स्पर्धा जिंकली आहे. नाशिकचे डॉ. अरुण गचाळे व त्यांचे सुपुत्र आविष्कार गचाळे या पिता-पुत्रानेही ही स्पर्धा जिंकून विक्रम केला आहे. नाशिकमधील तीन महिलांनीदेखील ही स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. जगभरात ही स्पर्धा होत असते. युरोप, उत्तर आणि दक्षिण अमेरिका, आफ्रिका, कोरिया, तैवान, मलेशिया ऑस्ट्रिया, कझाकीस्तान आदी देशांमध्ये पार पडणार्‍या या स्पर्धेत जगभरातून हजारो खेळाडू सहभागी होत असतात. बर्फाच्छादित प्रदेश, मायनस डिग्री तापमान अशा आव्हानात्मक वातावरणात 18 ते 99 वयोगटासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात येते. स्पर्धेवेळी तापमान तब्बल 10 अंशांवर असूनही कामगिरीत सातत्य ठेवत खेळाडू आगेकूच कायम ठेवत असल्याचे आजवरच्या स्पर्धांमधून समोर आले आहे. जलतरण, सायकलिंग, रनिंग हे तीन प्रकार स्पर्धेत पूर्ण करावे लागतात. आयर्नमॅन स्पर्धेनंतर आता यातील काही विक्रमवीर अल्ट्रामॅन स्पर्धेसाठी उतरणार आहेत.

नाशिकमध्ये ट्रायथलॉन अकॅडमीचे नियोजन :

भारतात प्रथमच 2019 मध्ये गोव्यात ही ‘हाफ आयर्न मॅन’ स्पर्धा पार पडलेली आहे. या स्पर्धेच्या तीन वर्षांनंतर त्या देशाला पूर्ण आयर्नमॅन स्पर्धा भरविता येते. खडतर परिश्रम घ्यावे लागतात. तसेच ऑलिम्पिकमध्येही ट्रायथलॉनचा समावेश करण्यात आल्याने आता लवकरच नाशिकमध्येदेखील ट्रायथलॉन अकादमी सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे. आयर्नमॅन स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंना उत्तमोत्तम प्रशिक्षण देण्यासाठी या अकादमीतून तीन तासांच्या प्रशिक्षणाच्या कालावधीतून प्रयत्न केले जाणार आहे. त्याचप्रमाणे ‘ट्रेनिंगपिक्स’सारखे ट्रेनिंग सेंटरही यासाठी कार्यरत आहेत.

…अशी असते स्पर्धा

आयर्नमॅन स्पर्धेसाठी https://www.ironman.com या संकेतस्थळावर नोंदणी केली जाते. तर www.ironmankazakistan च्या आयोजकाव्दारे स्पर्धेत सहभागी होता येते. स्पर्धेची वेळ 16 तास असते. त्यामध्ये पोहणे : 3.8 किलोमीटर, सायकल चालविणे : 180 किलोमीटर, धावणे : 42.2 किलोमीटर अशा प्रत्येक प्रकारातील निम्मे अंतर हे ‘आयर्नमॅन’ साठी असते. ही स्पर्धा खर्चिक असल्याने सर्वसामान्यांचा कल त्याकडे दिसून येत नाही. स्पर्धेच्या नोंदणीसाठीच केवळ पन्नास हजार रुपयांची फी असून, स्पर्धेसाठी प्रशिक्षण वर्ग लावल्यास त्या वर्गातील फीसह न्यूट्रीशनसाठी किमान वीस हजार रुपये भरावे लागतात. त्यामुळे स्पर्धेला सामोरे जाण्यासाठी कमीत कमी वर्षभरापासून पैशांची तजवीज करावी लागत असल्याचे काही आयर्नमॅन किताब पटकावणा-या विक्रमविरांकडून सांगण्यात आले.

‘आयर्नमॅन’ नंतर असते अल्ट्रामॅन स्पर्धा…

या स्पर्धेमध्ये ३२० मैलाचे म्हणजेच ५१५ किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. तसेच हवाईच्या मोठ्या बेटाच्या ठिकाणी सहभागी होत ६.२ मैल (१० किलोमीटर) खुल्या समुद्रात पोहणे, २६१.४ मैल (४२१ किलोमीटर) बाइक राइड आणि ५२.४ मैल (८४ किलोमीटर) अंतर धावणे, अशाप्रकारचे अंतर निर्धारीत करण्यात आले आहे. हा सर्व टप्पा निर्धारित वेळेत पार करणाऱ्या अल्ट्रामॅनचा किताब दिला जातो. हि स्पर्धा फक्त अमेरिका मध्ये होते.

या कारणांमुळे2022 मध्ये एकाच वेळी नाशिकला लाभले 20 आयर्नमॅन :

पूर्वी सगळे सेलिब्रिटी फक्त आयर्नमॅन स्पर्धा साठी उतरत होते. परंतु, 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या आयर्नमॅन स्पर्धेत डॉ. अरुण गचाळे, प्रशांत डबरी, महेंद्र छोरीया आणि किशोर घुमरे या सर्वसामान्यांनी सहभागी होत किताब पटकावला. त्यावेळी डांगरे पाटील अधिकारी व कमिशनर यांच्या उपस्थितीत सांगण्यात आले की, जर असे सर्वसामान्य स्पर्धा जिंकू शकतात तर मग कोणीही स्पर्धा जिंकू शकतात. याप्रमाणे आयर्नमॅन स्पर्धेबाबत जनजागृती करत इतरांनाही प्रेरीत करण्यात आल्याने आत्मविश्वास निर्माण होऊन एकाच वेळी 20  आयर्नमॅन नाशिकला लाभले आहेत.

हेही वाचा:

The post ‘आयर्नमॅन’चे शहर म्हणून नाशिकची नवी ओळख appeared first on पुढारी.