आयुध निर्माणीत ७५ किमी रेंज पॉडची निर्मिती; देशात प्रथमच होणार चाचणी

आयुध निर्माण

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : भुसावळ आयुध निर्माणीने सुरक्षा क्षेत्रात मोठी कामगिरी केली आहे. याठिकाणी पिनाका रॉकेट लाँचर पॉडचे उत्पादन केले जाते. आतापर्यंत या मिसाईलची क्षमता ४५ किमी पर्यंत होती. आता पिनाकाची मारक क्षमता वाढणार असून, ७५ किलोमीटर रेंज असलेला गाइडेड पिनाका लाँचर पॉडचे भुसावळ आयुध निर्माणीत उत्पादन करण्यात आले आहे. याची डिआरडीओ मार्फत पोखरण येथे चाचणी होणार आहे.

यंत्र इंडिया लिमिटेड अंबाझरीचे महासंचालक राजीव पुरी यांनी आयुध निर्माणी भुसावळ येथे भेट दिली. यावेळी त्यांनी गाइडेड पिनाका लाँचर पॉडच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला. ज्याची रेंज ७५ कि.मी. आहे आणि तो चंद्रपूर आयुध निर्माणीत पाठवला आहे. आयुध निर्माणी भुसावळ आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्यासाठी ही मोठी उपलब्धी आहे.

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ येथे गाइडेड पिनाका लाँचर पॉडचे उत्पादन केले जात आहे. ज्याची लवकरच चाचणी होणार आहे. त्याची रेंज ७५ किमी पर्यंत अचूकपणे लक्ष्यावर मारा करु शकते. या मिसाईलच्या हल्ल्यात १ किमी पर्यंतचे क्षेत्र नष्ट करू शकते. त्याच्या आत एक गाइडेड किट आहे. त्यामुळे योग्य दिशेने योग्य लक्ष्यावर अचुक मारा करू शकतो. त्याचे तंत्रज्ञान अधिक सुधारले जात आहे आणि अधिक आधुनिक केले जात आहे. त्यामुळे भारतीय लष्कराची ताकद वाढणार आहे.

इतरही उत्पादनांची यशस्वी निर्मिती

महासंचालक राजीव पुरी यांनी यावेळी आणखी इतरही उत्पादनांनाही हिरवा झेंडा दाखवून उत्पादने पाठविले. ज्यामध्ये स्टील बॉक्सची निर्मिती करण्यात आली असून, त्याचा उपयोग पिनाका रॉकेट ठेवण्यासाठी होतो. हे बॉक्स अंबाझरी आयुध निर्माणीत पाठवण्यात आले. तर मँगो पॅलेट व कंटेनर बॉक्स देखील चाचणीसाठी पाठवले. याप्रसंगी आयुध निर्माणी भुसावळचे महाव्यवस्थापक अनुराग एस. भटनागर सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. याबाबत डीजीएम बी. देवीचंद यांनी माहिती दिली.

हेही वाचा

The post आयुध निर्माणीत ७५ किमी रेंज पॉडची निर्मिती; देशात प्रथमच होणार चाचणी appeared first on पुढारी.