आयुष्मान कार्ड वाटपात राज्यात नाशिक प्रथम

नाशिक www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आयुष्मान भारत योजनेअंतर्गत ग्रामीण व शहरवासीयांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आयुष्मान गोल्डन कार्डवाटप करण्यात येत असून, आयुष्मान कार्ड वाटपात नाशिक राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 34 टक्के वाटपाचे काम पूर्ण झाले असून, हे उद्दिष्ट 70 टक्क्यांपर्यंत पोहोचविण्याचे आदेश पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत.

पालकमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणार्‍या आयुष्मान भारत योजनेच्या कामकाजाचा आढावा घेतला. पुढील महिन्याभरात जिल्हाभरात गोल्डन कार्ड वाटपासंदर्भात 70 टक्के उद्दिष्ट गाठण्याचे निर्देश आरोग्य विभागाला दिले. आतापर्यंत 34 टक्के उद्दिष्ट पूर्ण झालेले असून, पुढील महिन्याभरात एकूण 70 टक्के म्हणजेच 10 लाख 96 हजारांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत गोल्डन कार्ड वाटपासंदर्भात संपूर्ण राज्यात नाशिक प्रथम स्थानावर आहे. जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरात 16 लाख 12 हजार गोल्डन कार्डचे वाटप करण्यात येणार असून, आतापर्यंत 5 लाख 48 हजार गोल्डन कार्डांचे वाटप करण्यात आले आहे. तर 24 हजार 776 कार्ड (मृत, स्थलांतर) यामुळे रद्द करण्यात आले आहेत. नाशिकनंतर उस्मानाबाद, जालना, ठाणे, जळगाव यांचा क्रमांक आहे.

ग्रामीण भागात 40 टक्के वाटप…
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल अहिरे यांच्या नियंत्रणाखाली गोल्डन कार्ड मोहिमेची कार्यवाही सुरू आहे. एकूण गोल्डन कार्ड वाटपापैकी आतापर्यंत ग्रामीण भागात 40 टक्के, तर शहरी भागात 22 टक्के नागरिकांना कार्डवाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यात कार्डवाटपाचे 34 टक्के काम पूर्ण झाले आहे. एप्रिल 2022 पासून आतापर्यंत 1 लाख 24 हजार कार्डांचे वाटप करण्यात आले, तर मागील एकाच महिन्यात 57 हजार कार्डांचे वाटप करण्यात आले. कार्डवाटपामध्ये संपूर्ण राज्यात नाशिक प्रथम स्थानावर आहे. जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुर्ख्य कार्यकारी अधिकारी यांच्या प्रेरणेतून कार्डवाटपाची मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.

गोल्डन कार्डाची स्थिती…
गोल्डन कार्डामध्ये राज्याची महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना, तर केंद्राची आयुष्मान भारत योजनांचा समावेश करण्यात आला आहे. यापैकी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेद्वारे रुग्णाच्या दीड लाखापर्यंतच्या उपचाराचा खर्च उचलण्यात येणार असून, यापुढील खर्चासाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ मिळणार आहे.

यांची मदत घेणार…
जिल्ह्यातील 63 संलग्न हॉस्पिटल्स, 9 शासकीय रुग्णालये, 10 स्पेशल हॉस्पिटल, 53 मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल्स, शहरातील 23 हॉस्पिटल्स, तालुक्यातील 40 हॉस्पिटल्स याठिकाणी लाभार्थ्यांना कार्ड मिळणार.

हेही वाचा:

The post आयुष्मान कार्ड वाटपात राज्यात नाशिक प्रथम appeared first on पुढारी.