उत्तर महाराष्ट्र तापला; भुसावळमध्ये 43 तर नाशिकमध्ये पारा 39.2 अंशांवर

कोल्हापूर : पारा 34 अंशांवर

जळगाव : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने तापमानात घट झाली होती. मात्र सोमवारी (दि. 17) आकाश निरभ्र होताच उकाडा वाढला. भुसावळमध्ये तापमानाचा पारा 43 अंशांवर, तर जळगावात 42 अंश तापमानाची नोंद झाली. धुळ्यालाही सूर्यनारायणाने भाजून काढले असून, तेथे 41 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. नंदुरबारला 40.2 अंश सेल्सियस तापमान होते. जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमान वाढत आहे. मागील आठवड्यात तापमानाचा पारा 44 अंशांवर गेला होता. मात्र दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण, त्यात शनिवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र सोमवारी भुसावळमध्ये तापमान 43 अंश, तर जळगावात 42 अंशांवर होते. त्यामुळे दिवसभर उन्हाचे चांगलेच चटके बसत होते.

नाशिक : नाशिकमध्ये सलगच्या अवकाळीनंतर सोमवारी (दि.17) उष्णतेत वाढ झाली आहे. शहरात यंदाच्या हंगामातील उच्चांकी 39.2 अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली. वाढत्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. ग्रामीण भागातही उष्णतेच्या तीव्र झळांमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. पुढचे चार दिवस जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेसोबत काही भागांत अवकाळीची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने नाशिकला तडाखा दिला. त्यामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. या संकटातून बाहेर येत असतानाच आठवड्याच्या पहिल्याच दिवशी नाशिकचा पारा थेट 39 अंशांपलीकडे जाऊन पोहोचला. त्यामुळे तीव्र उकाडा जाणवत आहे. दुपारी 11 ते 4 वेळेत उन्हाचा तडाखा अधिक होता. परिणामी शहरातील रस्त्यांवर अघोषित लॉकडाऊन लावल्यासारखी परिस्थिती पाहायला मिळाली. तसेच घामाच्या धारांसोबत अंगाची काहिली होत असल्याने नागरिकांना घरात बसणेही मुश्कील झाले होते. उन्हापासून बचावासाठी पंखे, एसी, कूलरची मदत घेत आहे. ग्रामीण भागातही उष्णतेचा जोर वाढल्याने शेतीकामांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. दैनंदिन कामेही ठप्प पडत आहेत. त्यामुळे आधीच अवकाळीने त्रस्त जनतेला आता तीव्र उन्हाचा सामना करावा लागतो आहे. दरम्यान, येत्या चार दिवस जिल्ह्याच्या तापमानात सरासरी 2 ते 3 अंशांची वाढ होईल. त्यासोबत ग्रामीण भागात काही ठिकाणी अवकाळी व गारपीट होऊ शकते, असा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

हेही वाचा:

The post उत्तर महाराष्ट्र तापला; भुसावळमध्ये 43 तर नाशिकमध्ये पारा 39.2 अंशांवर appeared first on पुढारी.