उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळेच पक्ष दुभंगला : एकनाथ खडसेंची टीका

एकनाथ खडसे,www.pudhari.news

जळगाव : शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण गोठविण्यात आले आहे. यावरुन राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका केली आहे. दोघांच्या भांडणामुळे शिवसेनेचे दोन तुकडे झाले असून पक्ष दुभंगला आहे, असे खडसे यांनी म्हटले आहे. सेनेतील ही फूट राज्याच्या दृष्टीने योग्य नाही. यामुळे भाजपाला मजबूत होण्याची संधी मिळत असल्याचे खडसे म्हणाले आहेत.

जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आज बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ खडसे यांनी शिवसेनेतील सद्यस्थितीवर भाष्य केलंय. ते म्हणाले, शिवसेना पक्षाची सद्यस्थिती जी आहे, यात उद्धव ठाकरेंनी काय केलं आणि एकनाथ शिंदे यांनी काय केलं, अशा प्रकारे एकमेकांना दोष देण्यात काहीही अर्थ नाही. धनुष्यबाण मोडलं ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. यात काही चूका उद्धव ठाकरे यांच्याही असतील. पक्षप्रमुख म्हणून काम करताना चुका होत असतात. परंतु, एखादी चूक एवढी मोठी नसावी की ज्यामुळे पक्षच संपून टाकावा. तुम्ही पण संपले आणि ते पण. अशी स्थिती निर्माण होता कामा नये, अशा शब्दांत आमदार एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

चांदणी चौकातील काम संपेपर्यंत दररोज रात्री अर्धा तास वाहतूक असणार बंद

भाजपला पक्ष मजबूतीची संधी…
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाच्या संघर्षावर न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वजण आशेने पाहत आहे. मात्र, न्यायालय सुद्धा काही वेगळा निर्णय देईल असे वाटत नसल्याचे मत खडसे यांनी व्यक्त केले. बाळासाहेबांनी आपलं उभं आयुष्य शिवसेनेच्या वाढीसाठी घालवलं. त्यांनी संघर्षातून पक्षाची संघटना उभी केली होती. बाळासाहेबांच्या मेहनतीमुळे आणि कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे धनुष्यबाणाला एक प्रतिष्ठा मिळाली होती. बाळासाहेबांची वर्षानुवर्ष असलेली ही पुण्याई आता ठाकरे आणि शिंदे गटातल्या भांडणात धुळीस मिळाली आहे. शिवसेना पक्ष दुभंगला आहे, पूर्णतः मोडला गेला आहे. ही बाब फक्त राज्याच्याच नाही तर शिवसेनेच्या दृष्टीनेही हिताची नाही. शिवसेनेवर हल्ला झाला. या पक्षाचे तुकडे झाले म्हणून भाजपला आपला पक्ष मजबूत करण्याची संधी प्राप्त झाल्याचे आमदार खडसे म्हणाले.

हेही वाचा :

The post उद्धव ठाकरेंच्या चुकीमुळेच पक्ष दुभंगला : एकनाथ खडसेंची टीका appeared first on पुढारी.