उद्धव ठाकरे जनतेच्या कामासाठी बाहेर पडले नाही : अब्दुल सत्तार यांचा आरोप

अब्दुल सत्तार,www.pudhari.news

नाशिकरोड पुढारी वृत्तसेवा

महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना फक्त एकदा मंत्रालयात आले होते ते जनतेच्या कामासाठी कधी बाहेर पडले नाही असा आरोप कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी केला.

येथील विभागीय महसूल आयुक्त कार्यालयात कृषी विभागाच्या आढावा बैठकीसाठी मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध माहिती दिली. सत्तार म्हणाले,  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा जो निर्णय घेतला तो त्यांचा पक्षांतर्गत निर्णय आहे.  त्याबद्दल मी जास्त भाष्य करू शकत नाही. शरद पवार यांनी आपल्या पुस्तकांमध्ये जे लिखाण केले आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना दोन वेळा मंत्रालयात आले होते असा उल्लेख करून नाराजी व्यक्त केली असल्याचे ते म्हणाले.

मी त्यावेळेस राज्यमंत्री होतो, उद्धव ठाकरे हे मंत्रालयात एकदाच आले होते. जनतेच्या कामासाठी उद्धव ठाकरे कधीही बाहेर पडले नाही अथवा त्यांनी वेळ दिला नाही अशी टीका त्यांनी केली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 41 आमदार व 13 खासदार आहे. निवडणूक आयोगाने आमच्याकडील बहुमत पाहून आम्हाला पक्षाचे चिन्ह व शिवसेना हे नाव दिले. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आमच्या बाजूने निकाल देईल याची आम्हाला खात्री वाटते. न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे असेही ते म्हणाले.

महाविकास आघाडीच्या आगामी काळात होणाऱ्या वज्रमुठ सभा रद्द करण्यात आल्या याबाबत विचारले असता ते म्हणाले की वज्रमुठ मधील एक मूठ गेली नंतर दुसरी जाणार तिसरी जागेवरच राहणार असेही ते म्हणाले.  सकाळचा भोंगा हा वज्रमुठ तोडण्याचे काम करत आहे असा आरोपही त्यांनी खासदार संजय राऊत यांचे नाव न घेता केला आमच्या मतावर ते खासदार झाले व आम्हालाच शिव्या देतात असा आरोप करून सत्तार म्हणाले की सकाळचा भोंगा रोज वाजतो त्याचा परिणाम महाराष्ट्रावर होत आहे.

कोकणात बारसू बाबत जे राजकारण सुरू आहे ते चुकीचे असून उद्धव ठाकरे यांनी ती जागा निश्चित केली व तसेच सांगितले होते आता मात्र तेच स्वतः विरोध करत आहे असे ही नामदार सत्तार म्हणाले.

हेही वाचा :

The post उद्धव ठाकरे जनतेच्या कामासाठी बाहेर पडले नाही : अब्दुल सत्तार यांचा आरोप appeared first on पुढारी.