उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील

धुळे; पुढारी वृत्तसेवा : देशातील सर्वसामान्य जनतेच्या खाण्याच्या वस्तूंवर जीएसटीच्या माध्यमातून कर लावून लुटण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. सर्वसामान्य माणसांची लूट करून भरलेली तिजोरी केंद्र सरकार त्यांच्या उद्योगपती मित्रांवर कर्ज माफ करण्यासाठी खाली करत असल्याचा खळबळजनक आरोप काँग्रेसचे कार्याध्यक्ष तथा आमदार कुणाल पाटील यांनी केला. केंद्र सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात काँग्रेस आक्रमक होत असल्यामुळेच नेत्यांवर केंद्रीय संघटनांच्या माध्यमातून दडपण आणण्याचे काम केंद्र सरकार करत आहे. मात्र या दडपणाला काँग्रेसच्या कार्यकर्ता भीक घालणार नाही, असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

धुळ्याच्या महात्मा गांधी चौकात आज (दि.२६) काँग्रेसच्या वतीने सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेसचे सरचिटणीस युवराज करनकाळ, मनपाचे माजी विरोधी पक्षनेते साबीर खान, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस डॉ. दरबारसिंग गिरासे, खरेदी विक्रीचे चेअरमन लहू पाटील, ज्येष्ठ नेते रमेश श्रीखंडे, विमलताई बेडसे, पं.स.चे माजी सभापती भगवान गर्दे, ज्येष्ठ नेते डॉक्टर अनिल भामरे, जवाहर सूतगिरणीचे संचालक डॉक्टर दत्ता परदेशी, माजी नगरसेवक शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन, ज्येष्ठ नेते शकील अहमद, बाजार समितीचे मुख्य प्रशासक रितेश पाटील, तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अशोक सुडके उपस्थित होते.

आमदार कुणाल पाटील म्हणाले की, जीएसटीच्या माध्यमातून आता खाण्याच्या वस्तूंवर कर लावून सर्वसामान्य जनतेला अडचणीत आणण्याचे काम केंद्रातील सरकार करीत आहे. या कराच्या माध्यमातून तिजोऱ्या भरून त्या उद्योगपती मित्रांचे कर्ज माफ करण्याकडे हा पैसा वापरला जातो आहे. अशा अनेक चुकीच्या कामांना काँग्रेसच्या माध्यमातून विरोध होत असल्यामुळेच केंद्र सरकार काँग्रेसच्या नेत्यांवर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून चौकशीचा फार्स करत आहे.

वास्तविक पाहता या देशाच्या जडणघडणीमध्ये गांधी परिवाराचा मोठा सहभाग राहिला आहे. या परिवाराने देशासाठी बलिदान केले. तर देश घडवण्यात मोठे योगदान दिले आहे. या देशाच्या स्वातंत्र्यलढ्याच्या वेळेस संपूर्ण संपत्ती देशासाठी दान करण्याचे काम त्यांनी केले आहे. अशा परिवाराला ईडीच्या माध्यमातून घाबरवण्याचे काम केंद्रातील सरकार करत आहेत. मात्र, काँग्रेसचे नेते केंद्राच्या या दडपणाला घाबरणार नाही. तसेच दडपणाला बळी देखील पडणार नाही. केंद्राच्या या दडपशाहीच्या विरोधात काँग्रेसचा कार्यकर्ता संघटितपणे लढा देणार असल्याचा इशारा यावेळी आमदार पाटील यांनी दिला.

हेही वाचलंत का ? 

The post उद्योगपतींच्या कर्जमाफीसाठी केंद्राकडून सर्वसामान्यांची लूट : आमदार कुणाल पाटील appeared first on पुढारी.