Site icon

उद्योगमंत्री उदय सामंत : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
उद्योजकांची दुहेरी फायरसेसमधून सुटका करून त्यांच्याकडून एकच कर घेतला जाईल. तसेच जाचक मालमत्ता कराबाबतही उद्योजकांना दिलासा देण्यात येणार असून पूर्वीच्या औद्योगिक श्रेणीच्या दराप्रमाणेच हा कर आकारावा, अशा सूचना महापालिका आयुक्तांना देण्यात येतील, अशी घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. तसेच नाशिकमध्ये 100 एकरावर आयटी पार्क, 100 एकरावर कृषी प्रक्रिया केंद्र तसेच डेटा सेंटरही उभारणार असल्याची घोषणा सामंत यांनी केली.

नाशिक, सिन्नर तसेच जिल्ह्यातील उद्योजकांना भेडसाविणार्‍या प्रश्नांबाबत चर्चा करण्यास आयमाच्या अंबड येथील सभागृहात आयोजित बैठकीत मार्गदर्शन करताना सामंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दादा भुसे, खा. हेमंत गोडसे, आ. सीमाई हिरे, आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ, सरचिटणीस ललित बूब, सल्लागार समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर गोपाळे, माजी अध्यक्ष धनंजय बेळे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, राजेंद्र अहिरे आदी उपस्थित होते. आयमाच्या उद्योजकांना दुहेरी फायरसेस द्यावा लागतो, ही बाब निश्चितच अन्यायकारक असल्याचे मान्य करून एकच कराबाबत धोरणात्मक निर्णय होईपर्यंत दुहेरी सेसची वसुली स्थगित ठेवण्याच्या सूचनाही आपण देत असल्याची घोषणा त्यांनी केली. त्यांच्या या घोषणेचे उद्योजकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले. आयमाने याप्रश्नी सतत पाठपुरावा केला होता. ट्रक टर्मिनसचा प्रश्न लवकर सोडविणार असून सीईपीटीबाबत लवकरच निर्णय घेऊ. उद्योजकांबरोबर महिन्यातून एक बैठक घेण्यास आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना सांगण्यात येईल. नाशकात 100 एकर जागेत आयटी पार्क करता येईल का? याचा विचार सुरू आहे. नाशिकला अ‍ॅग्रो-इंडस्ट्री पार्क सुरू करता येईल का? याचा विचारही सुरू आहे असे सांगतानाच येत्या बुधवारी नाशिकच्या औद्योगिक वसाहतींच्या प्रश्नांच्या निराकरणासाठी येत्या बुधवारी मुंबईत पालकमंत्री दादा भुसे यांच्या दालनात बैठक घेण्याची घोषणा ना. सामंत यांनी केली. पूर्वीचे मंत्री मंत्रालयात बैठका घ्यायचे. मात्र आम्ही जागेवर बैठका घेऊन प्रश्न मार्गी लावतो. नाशकात उद्योग येण्याची क्षमता आहे, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

आयमाने जिल्ह्याचे नेतृत्व करावे, अशी सूचना पालकमंत्री दादा भुसे यांनी केली. त्याला सर्वांनी टाळ्या वाजवून दाद दिली. उद्योगधंदेवाढीसाठी नाशिकसह राज्यात चांगले वातावरण आहे. मात्र विरोधक नाहक राज्याची प्रतिमा मलीन करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आयमाच्या पुढाकाराने नाशकात 6000 कोटींची गुंतवणूक येणार हे शुभ संकेत असल्याचेही ते म्हणाले. अंबड औद्योगिक वसाहत परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे होणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले. नाशिक जिल्ह्यातील बंद असलेले उद्योग परत सुरू कसे करता येतील याबाबत धोरणात्मक निर्णय व्हावा, तसेच आयटीसाठी प्रोत्साहनात्मक योजना लागू करता येतील काय? याचा विचार व्हावा, आदी सूचना खा. हेमंत गोडसे यांनी यावेळी केल्या. औद्योगिक क्षेत्रासाठी वीजदर कमी करावे, ट्रक टर्मिनस व्हावे आदी सूचना आमदार सीमा हिरे यांनी केल्या. आयमाचे अध्यक्ष निखील पांचाळ आणि माजी अध्यक्ष धनंजय बेळे यांनी अंबड, सातपूरसह जिल्ह्यातील उद्योजकांचे ज्वलंत प्रश्न मांडले. अंबडचे विभाजन करून एमआयडीसी परिसरात स्वतंत्र पोलीस ठाणे, दिल्ली-मुंबई औद्योगिक कॉरिडॉरच्या दुसर्‍या टप्यात नाशिकचा समावेश करावा, नाशकात गुंतवणुकीसाठी प्रोत्साहनात्मक योजना जाहीर करा, मालमत्ता कराची आकारणी पूर्वीच्या दराने करावी आदी मागण्या त्यांनी केल्या. सिन्नर औद्योगिक वसाहतीचे प्रश्न नामकर्ण आवारे यांनी मांडले. विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी रमेश वैश्य, सुधाकर देशमुख, संदीप गोयल, राजेंद्र फड यांनीही यावेळी मौलिक सूचना केल्या. यावेळी आयमाच्या डिरेक्टरीचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी ज्येष्ठ उद्योजक विक्रम सारडा, आयमा उपाध्यक्ष राजेंद्र पानसरे, सुदर्शन डोंगरे, सहसचिव योगिता आहेर यांच्यासह आयमाचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नाशिकमध्ये येणार नवी गुंतवणूक
जिंदाल लि. 250 कोटी, रिलायन्स लाइफ सायन्स 4200 कोटी, सॅमसोनाईट लिमिटेड, डीडीके एपकॉस 500 कोटी, रोषे हर्डे 350 कोटी, इंडियन ऑइल कॉर्पोरेशन 400 कोटी तर जोस्टिक अ‍ॅडेसिव्हज नाशिकमध्ये 150 कोटींची गुंतवणूक करणार असल्याचे धनंजय बेळे यांनी सांगितले. या कंपन्यांचे वरिष्ठ अधिकारी चंद्रशेखर राव, ज्ञानेश्वर पाटील, एच. एस. बॅनर्जी, मनीष अग्रवाल, जी. पी. एस.सिंग, जयंत जोगळेकर यांचा सत्कार उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आला.

खोक्यावरून हास्यकल्लोळ
ना . उदय सामंत यांनी भाषणात सांगितले की तुमचा विभागाचा विकास करायचा होता म्हणुन मी व ना. दादा भुसे गुवाहाटीला गेलो होतो, असे म्हणताच एकच हशा पिकला. तसेच आयोजकांनी डिरेक्टरी प्रकाशनावेळी खोके दिले. आयोजकांनी खोक्यात काय आहे ते सांगावे, नाहीतर विरोधकांना पुन्हा पत्रकार परिषद घ्यायला लागेल, असे म्हणताच एकच हशा पिकला.

हेही वाचा:

The post उद्योगमंत्री उदय सामंत : दुहेरी फायरसेसच्या जाचातून उद्योजकांची सुटका appeared first on पुढारी.

Exit mobile version