उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिकच्या भूमीतून महाविजय अभियानाचा संकल्प

उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस www.pudhari.news 

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
2024 च्या विधानसभा निवडणुकीत दीडपट जागा जिंकून पुन्हा सत्तेवर येण्याचा विश्वास उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी (दि. 11) येथे व्यक्त केला. आगामी लोकसभा निवडणुकीत 45, तर विधानसभा निवडणुकीत 200 जागा जिंकण्याची ग्वाही देत ‘महाविजय अभियान 2024’ची घोषणाही त्यांनी नाशिकच्या भूमीतून केली.

भाजप प्रदेश कार्यकारिणी बैठकीच्या समारोपाप्रसंगी मार्गदर्शन करताना ना. फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या काळात एकही सांगता येईल, अशी योजना आणली नाही. स्वत:च्या जीवनात परिवर्तन करणे आणि स्वत:चे घर भरण्यापलीकडे आघाडी सरकारने काहीच केले नाही. आता अडीच वर्षांत हे चित्र पालटण्यासाठी आपल्याला 20-ट्वेंटी मॅच खेळायची असून, त्याची आम्ही सुरुवात केली आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या भाषणाने कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांमध्ये जोश भरला. मिळालेल्या जबाबदारीचा उपयोग करून सर्वसामान्यांमध्ये परिवर्तन घडविणे हाच भाजपचा मूलमंत्र आहे. पंडित दीनदयालजींनी अंत्योदयाचा मंत्र दिला. सामाजिक व आर्थिक विकास हा विचार त्यांनी देशाला दिला. खर्‍या अर्थाने हा विचार प्रत्यक्षात आणण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी करत आहेत. चुकीच्या इच्छाशक्ती, अनियंत्रित महत्त्वाकांक्षा आणि अहंकाराचा त्याग आपल्याला करावा लागणार असल्याचा कानमंत्र ना. फडणवीस यांनी दिला.

व्यासपीठावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन, आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित, विधान परिषदेचे नेते प्रवीण दरेकर, केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे, पंकजा मुंडे, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, खासदार अनिल बोंडे, खासदार उदयनराजे भोसले, शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार देवयानी फरांदे, अ‍ॅड. राहुल ढिकले, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, लक्ष्मण सावजी यांच्यासह पक्षाचे राज्यातील सर्व खासदार, आमदार तसेच प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

समर्पण भाव हवा…
पदे येतील-जातील; पण सेवा करण्याची संधी सोडू नका, असा सल्ला कार्यकर्त्यांना देत आपण लोकांचा विश्वास कमावला, तरच जनता आपल्या सत्तेवर ठेवणार असल्याची आठवण त्यांनी करून दिली. आपले समर्पण मी पक्षासाठी मागतो आहे. पक्षासाठी श्रम, वेळ द्या, तर महाविजयाचे अभियान आपण पूर्ण करू शकू, असा विश्वासही ना. फडणवीस यांनी व्यक्त केला.

मला अडकवण्यासाठी जंग जंग पछाडले 
दीड पायाचे ऑटो रिक्षा सरकार कधी गडगडेल याचा भरोसा नसल्याने नको तेवढा भ्रष्टाचार आणि दुर्व्यवहार महाविकास आघाडीने केला. भाजप कायकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केले. मला खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्यासाठी त्यांनी जंगजंग पछाडले. अख्खे सरकार मागे लागले; मात्र काहीच करू शकले नाही. मी यांच्या बापालाही घाबरत नाही, अशी जहरी टीका करत ज्यांच्यावर ही जबाबदारी दिली तेच जेलमध्ये गेल्याचे सांगत ना. फडणवीस यांनी आघाडीवर शरसंधान साधले.

हे तर खुद्दारांचे सरकार
हे गद्दारांचे नव्हे, तर खुद्दारांचे सरकार आहे. जनता, हिंदुत्व, विचार यांच्यासाठी हे सरकार आहे. गद्दारांचे सरकार तर तुमचे होते, अशी जोरदार टीका करत जनतेच्या मतांचा अवमान करणार्‍या गद्दारांमधून खुद्दार बाहेर पडले आणि गद्दारांना मातीत गाडले, अशी स्तुतिसुमने फडणवीस यांनी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या आमदारांवर उधळली. कायदा तुम्हालाच कळतो का? असा प्रश्न करत आम्हालादेखील कायदा, संविधान कळते. परंतु, त्यांना भीती आहे की, उरलेसुरले 10-15 ही निघून जातील. त्यामुळेच ते वारंवार गद्दार अशी संभावना करून उरलेल्यांना गोंजारत असल्याची टीकाही ना. फडणवीस यांनी केली. आपण नियमानेच सरकार केले आहे. सर्वोच्च न्यायालयात आपल्या बाजूनेच निकाल येईल, असा विश्वास व्यक्त करत संविधानसंमत सरकार असल्यानेच विरोधक निवडणूक आयोगावर आरोप आणि अविश्वास दाखवत दबाव आणण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नाशिकच्या भूमीतून महाविजय अभियानाचा संकल्प appeared first on पुढारी.