एकनाथ खडसेंना दुहेरी झटका! जिल्हा दूध संघावर प्रशासक, चौकशीसाठी समिती नियुक्त

एकनाथ खडसे

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघातील गैरकारभाराबाबत तक्रार करण्यात आली होती. आता मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने चौकशीसाठी शासनाने एक चौकशी समिती गठीत केली आहे. तर दुसरीकडे विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करून जिल्हा दूध संघावर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. दूध संघावर एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाताई खडसे या अध्यक्ष आहेत. त्यामुळे राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे खडसेंना दुहेरी झटका दिला आहे.

जळगाव जिल्हा दूध संघातील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी नागराज जनार्दन पाटील यांनी विनंती केली होती. दूध संघाच्या कारभारातील अनियमितता तसेच या दूध संघात राबविण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची तक्रार शासनाकडे केली होती. मात्र गेल्या काळातील महाविकास आघाडी सरकारकडून त्याची कुठलीही दखल घेतली नव्हती. आता राज्यात सत्तांतर होताच चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे.

संचालक मंडळ बरखास्त

राज्य सरकारने याप्रकरणी पाच जणांची चौकशी समिती नियुक्ती केली आहे. तर दुसरीकडे एकनाथ खडसे यांची पत्नी मंदाताई खडसे अध्यक्ष असलेले संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी प्रशासक नियुक्त केले आहे. विशेष लेखापरीक्षक अध्यक्ष असलेल्या या चौकशी समितीत पाच जणांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश आज गुरुवारी (दि.२८ जुलै) राज्य सरकारच्या कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागाचे उपसचिव नी. भा. मराळे यांनी पारित केले आहेत, अशी माहिती या प्रकरणातील तक्रारदार नगराज पाटील यांनी दिली आहे.

प्रशासक मंडळात यांचा आहे समावेश

११ सदस्यीय प्रशासक मंडळात मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, भाजप आमदार मंगेश चव्हाण, अजय भोळे, अमोल पाटील, अरविंद देशमुख, राजेंद्र राठोड, अशोक कांडेलकर, गजानन पाटील, अमोल शिंदे, विकास पाटील या ११ जणांचा समावेश आहे.

चौकशीमागे राजकारण : एकनाथ खडसे

दूध संघाच्या कारभारात एक रुपयाचा भ्रष्टाचार झालेला नाही. जर झाला असेल तर दोषींवर कारवाई करावी, याची मागणी मी स्वतःच करणार आहे. संचालक मंडळ बरखास्त करून या ठिकाणी तातडीने प्रशासक नियुक्त करणे तसेच चौकशी समिती नियुक्त करणे यात मोठे राजकारण असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले.

The post एकनाथ खडसेंना दुहेरी झटका! जिल्हा दूध संघावर प्रशासक, चौकशीसाठी समिती नियुक्त appeared first on पुढारी.