एकनाथ खडसे : ठरलं…..मी राष्ट्रवादीत राहणार

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथ खडसे हे पुन्हा भाजपमध्ये जाण्याविषयीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी एकनाथ खडसे आणि रक्षा खडसे हे दिल्लीत गेले होते. ही वार्ता राज्यात पसरताच खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना जोर आला होता.

यावर खडसे यांनी खुलासा केला असून, ‘मी भाजपात जाणार नाही, मी राष्ट्रवादीतच राहणार, असा पुनरुच्चार आ. एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या भाजपात जाण्याच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. एकनाथ खडसेंनी यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली असल्याचा दावा मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी केला होता. त्यामुळे खडसे आगामी काळात पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करु शकतात, असाही अंदाज व्यक्त केला जात होता. याबाबत आ. खडसे यांनी आपला खुलासा करत, आपण भाजपमध्ये जाणार नाही, राष्ट्रवादीतच राहणार असे ठाम उत्तर एकनाथ खडसे यांनी दिल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. जर येणार्‍या काळात विरोधी पक्ष विखुरलेले अवस्थेत राहिला तर त्याचा फायदा हा भाजपाला होऊ शकतो आणि तस कारस्थान भाजपाकडून सुरु असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा गंभीर आरोप यावेळी एकनाथ खडसे यांनी केला आहे. एकेकाळी भाजपचे दोन खासदार असताना भाजपला हिणवले जायचे. त्यावेळी आम्ही मोठ्या मेहनतीने पक्ष वाढवला. तर बनिया, ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या भाजपला गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, एकनाथ खडसे यांच्यामुळे बहुजनांचा पक्ष म्हणून ओळख मिळाली असल्याचेही खडसे यांनी म्हटले आहे.

नाराजीनंतर खडसेंंचा राष्ट्रवादीत प्रवेश…
एकेकाळी एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातील भाजपचा चेहरा होते. 2014 मध्ये ते मुख्यमंत्रीपदाचे दावेदार देखील समजले जात होते. परंतु गेल्या काही वर्षांपासून एकनाथ खडसे हे भाजपात नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. अखेर एकनाथ खडसे यांनी शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. माझा खूप छळ झाला, किती अपमान झाला तरीही मला पक्ष सोडायचा नव्हता. परंतु त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली की शेवटी मला पक्ष सोडावा लागला, असं म्हणत एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

हेही वाचा:

The post एकनाथ खडसे : ठरलं.....मी राष्ट्रवादीत राहणार appeared first on पुढारी.