एटीएम कार्डची अदलाबदल करून गंडा घालणारी टोळी धुळ्यात गजाआड

धुळे क्राईम,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

एटीएम कार्डची अदलाबदल करून मजुरांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या टोळीला सांगवी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाने गजाआड केले. या टोळीवर मुंबई आणि परिसरातून तब्बल 12 गुन्हे दाखल असल्याची प्राथमिक माहिती पुढे आल्याचे धुळ्याचे पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्पष्ट केले आहे.

या गुन्ह्यासंदर्भातील माहिती अशी की, मुंबई-आग्रा महामार्गावर शिरपूर तालुक्यातील शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात मुंबई पासिंग असणाऱ्या एका कारमध्ये टोळके संशयास्पदरीत्या टेहळणी करीत आहे, अशी माहिती सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथक दहीवद गावाकडे रवाना करून टोळक्याचा शोध घेत स्विफ्ट डिझायर वाहनाला थांबवत चौघांची विचारपूस केली. या वाहनामध्ये विकी राजू वानखेडे (रा. कल्याण), अनिल कडोबा वेलदोडे (रा. उल्हासनगर), वैभव आत्माराम महाडिक (रा. वालधुनी), विकी पंडित साळवे (रा. उल्हासनगर) या चौघांना ताब्यात घेतले. वाहनाची तपासणी केली असता वेगवेगळ्या बँकांचे 94 एटीएम कार्ड त्याचबरोबर गुन्ह्यासाठी वापरण्यात येणारे मोबाइलदेखील आढळले. चौघांनी पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी एटीएम कार्ड बाळगणाऱ्या ग्राहकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हातचलाखीने एटीएम कार्ड बदलून पैशांची हेराफेरी करीत असल्याची कबुली दिली. अधिक चौकशीमध्ये, या टोळीने जळगाव जिल्ह्यातील भडगाव तसेच भिवंडी, पिंपरी-चिंचवड, रायगड, नवी मुंबई, ठाणे, पेल्हार अशा परिसरामध्ये चोरी केल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यानुसार धुळे पोलिसांनी या टोळक्याला अटक केल्याची माहिती पेल्हार पोलिसांना दिली. त्यांना प्रथम मुंबई आणि परिसरातील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी हस्तांतरित केले जाणार असल्याची माहितीही पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी दिली.

दरम्यान पोलिस अधीक्षक बारकुंड यांनी जनतेला एटीएम कार्ड वापरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. एटीएम सेंटरच्या बाहेर अनोळखी व्यक्ती आढळल्यास त्याच्याकडून मदत न घेता बँकेचा सुरक्षारक्षक किंवा संबंधित कर्मचारी याचीच मदत घेण्याचे स्पष्ट केले आहे. धुळे जिल्ह्यातही बऱ्याच एटीएम सेंटरवर संबंधित बँकेने सुरक्षारक्षक नेमलेले नाहीत. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेरेदेखील सदोष असल्याची बाब निदर्शनास आली आहे. जनतेची फसवणूक टाळण्यासाठी या संबंधित बँकांना संबंधित कर्मचारी नियुक्त करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेही वाचा : 

The post एटीएम कार्डची अदलाबदल करून गंडा घालणारी टोळी धुळ्यात गजाआड appeared first on पुढारी.