एफएमसीजीचे शेअरबाजारात चौकार-षटकार

गुंतवणुकीच्या विश्वात www.pudhari.news

नाशिक : राजू पाटील

गुंतवणुकीच्या विश्वात

ग्राहकपयोगी वस्तू म्हणजेच एफएमसीजी कंपन्यांच्या कामगिरीवर शेअरबाजाराची यंदा बारीक नजर आहे. कोलगेट, जिलेट इंडिया, गोदरेज कन्झ्युमर, पी ण्ड जी हायजिन, वेंकिज, आयटीसी या कंपन्या येत्या 10 ते 25 मेदरम्यान आर्थिक कामगिरी जाहीर करणार आहे. या कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अनेक नवीन उत्पादने बाजारात आणली आहेत. कोरोनानंतर जनजीवन सुरळीत झाल्याने या कंपन्यांच्या उत्पादनांना मागणी वाढल्याने कंपन्यांचे मार्जिन दहा टक्क्यांच्यावर राहण्याचा अंदाज तज्ज्ञांनी आणि ब्रोकिंग फर्मने व्यक्त केला आहे. 2021-22 मध्ये या कंपन्यांच्या कच्च्या मालाच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याने त्या अडचणीत आल्या होत्या. मात्र, 2022-23 मध्ये कच्च्या मालाच्या किमतीत घसरण, कृषी मालाच्या स्थिर किमती आणि वाहतूक खर्चात कपात यामुळे या कंपन्यांसाठी 2022-23 उत्तम आणि आशादायी वर्ष राहणार आहे. याचे संकेत एप्रिलमध्ये हिंदुस्तान युनिलिव्हरच्या जबरदस्त कामगिरीने मिळाले आहेत. हे क्षेत्र पूर्णत: मागणीवर अवलंबून आहे आणि शहरी भागातील मागणीत जबरदस्त वाढ झाल्याने एफएमसीजी कंपन्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रकाशझोतात आल्या आहेत. त्यांचे समभाग उच्चांकी पातळीवर झेपावण्यास सज्ज झालेले आहेत.

बाजार भांडवला-नुसार भारतातील सहाव्या क्रमांकाची सर्वांत मूल्यवान कंपनी असलेल्या आयटीसीच्या समभागाने शुक्रवारच्या इंट्राडेट्रेड-मध्ये प्रत्येकी 431.9 रुपयांच्या उच्चांकी भावाला स्पर्श करत गुंतवणूकदारांना सुखद धक्का दिला. ग्राहकोपयोगी वस्तू उत्पादन क्षेत्रातील म्हणजेच एफएमसीजी क्षेत्रातील ही दिग्गज कंपनी असलेल्या आयटीसीने 2014 ते 2021 या काळात गुंतवणूकदारांची अक्षरश: संयमाची परीक्षा पाहिली. कंपनीचा शेअर 2014 मध्ये 230 रुपयांवर होता आणि 2019 मध्येही 241 रुपयांवर होता. गेल्या चार वर्षांत अध्यक्ष संजीव पुरी यांनी कंपनीला खर्‍या अर्थाने एफएमसीजीचा चेहरा देत बिस्कीट, नूडल्स, डेअर, फ्रोझन फूड्स, चॉकलेट, वह्या, लहान मुलांसाठी नानाविध खाद्यपदार्थ, साबण यात विविधता आणत त्यांना मेगा ब्रॅण्डचे स्वरूप प्रदान केल्याने या समभागाने 2021 पासून वेग घेत 230 वरून थेट 400 रुपयांवर झेप घेतली आहे. कंपनीने 31 मार्च 2022 अखेर 90 हजार कोटी रुपयांच्या उत्पादनांची विक्री साध्य करताना 15 हजार कोटी रुपयांचा नफा कमविला आहे. कंपनी येत्या 18 मे रोजी 2022-23 मधील आपली आर्थिक कामगिरी जाहीर करणार आहे. केवळ गुंतवणूकदारच नव्हे तर सार्‍या कॉर्पोरेट विश्वाचे, सरकारने, तज्ज्ञांचे लक्ष कंपनीच्या कामगिरीकडे लागलेले आहे. एकतर भारतात गेल्या वर्षी अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या विक्रीत घट झाल्याने नागरिकांनी काही अंशी पैसे वाचविण्यावर भर दिल्याचे अनेक सरकारी अहवालात नमूद करण्यात आलेले आहे. आयटीसीने चमकदार कामगिरी जाहीर केल्यास नागरिक ‘सावधान’ मानसिकतेतून बाहेर पडल्याचे द्योतक मानले जाईल. सध्या आयटीसीचे भांडवली बाजारमूल्य 5.33 ट्रिलियन रुपये आहे. पुढील दोन आठवडे शेअरबाजार स्थिर राहिल्यास आयटीसीचा समभाग गेल्या वर्षी एसबीआयच्या समभागाने वार्षिक निकालावेळी जशी कमाल दाखविली तशीच कमाल दाखवू शकतो, अशी अटकळ आहे. गेल्या वर्षी एसबीआयचा 2021-22 चा वार्षिक निकाल शनिवारी जाहीर होताच एसबीआयच्या समभागाने सोमवारी बाजार उघडताच तब्बल 70 रुपयांची उसळी मारत मालामाल केले. तो जोरदार बॅटिंग करेल काय, याचे उत्तर 18 मे रोजी मिळणार आहे.

या लेखात देण्यात येणारे गुंतवणुकीचे सल्ले लेखक अभ्यास करून देत असतात. पण; गुंतवणुकीत जोखीम ही असतेच. ती लक्षात घेऊनच गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.

The post एफएमसीजीचे शेअरबाजारात चौकार-षटकार appeared first on पुढारी.