एरंडोलमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

वीज चोरी रोखण्यासाठी महावितरण पथकाव्दारे कारवाई केली जात असून, वीज चोरी करणाऱ्या ग्रामस्थांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरण कर्मचाऱ्याला बेदम मारहाण झाल्याची घटना एरंडोल तालुक्यात घडली आहे.

एरंडोल तालुक्यातील जवखेडा गावात वीजचोरी करणारे आकडे काढण्यासाठी महावितरणचे पथक मंगळवारी (दि.30) गेले होते. या दरम्यान गावातील मनोज प्रताप पाटील यांच्या शेतातील अवैध हुक लावलेली वायर पकडण्यात आली. त्यामुळे त्याचा राग येऊन पाटील यांनी वीज कर्मचारी अक्षय महाजन यांच्यावर मोठ्या दांडक्याने हल्ला करत मारहाण केली. यामध्ये महाजन यांच्या डोक्याला जबर मार लागला असून हात फ्रॅक्चर झाला आहे. त्यांच्यावर जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून याप्रकरणी जखमी महाजन यांच्या तक्रारीवरून मारहाण करणाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कठोर कारवाईची मागणी…

या पथकात वीज वितरणचे कर्मचारी इच्छानंद पाटील, पंकज नारायण येवले, अमोल रमेश रामोशी, अक्षय रमेश महाजन, गजानन शंकर मराठे व इतर कर्मचारी सहभागी झाले होते. या पथकाने जवखेडा खुर्द येथे विज चोरीविरुध्द कारवाई केली. त्यातील वरिष्ठ तंत्रज्ञ अक्षय महाजन यांनी मनोज प्रताप पाटील यांच्या शेतातील त्यांनी अवैध जोडणी केलेली वायर काढली असता मनोज पाटील यांनी त्यांना मारहाण केली. त्यामुळे पोलीस स्टेशनला महावितरणचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तक्रार केली असून, एरंडोल पोलीस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधितावर कडक कारवाईची मागणी वीज कर्मचाऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा:

The post एरंडोलमध्ये महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण appeared first on पुढारी.