कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ

नाफेड,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाफेडच्या माध्यमातून केंद्र सरकारने केलेल्या कांदा खरेदीची कागदपत्रे चाैकशी समितीला उपलब्ध करून देण्यास नाफेडच्या अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ करण्यात येत आहे. पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नी चाैकशीचे आदेश दिले असताना नाफेडचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्रकुमार यांच्या आडमुठेपणाचा प्रत्यय समितीमधील अधिकाऱ्यांना आला आहे.

केंद्र सरकारने नाफेडच्या सहाय्याने दोन लाख ३८ हजार मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली. मात्र, मध्यंतरीच्या काळात कांद्याचे वाढलेले दर, नाफेडने खरेदी केलेल्या कांद्याची राज्यअंतर्गत वितरण आणि साठवणुकीत कांद्याच्या चाळीत झालेले नुकसान आदी प्रश्नांवरून ही खरेदी वादात सापडली आहे. त्यातच खरेदी केलेल्या कांद्याचे पैसे अद्यापही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेली नसल्याच्या तक्रारी आहेत. केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनीही नाफेडच्या अनियमिततेबाबत नाराजी व्यक्त केली होती. या सर्व पार्श्वभूमीवर पालकमंत्री भुसे यांनी १० ऑक्टोबरच्या जिल्हा नियोजनच्या बैठकीत नाफेडच्या खरेदीचे आदेश दिले होते. चाैकशीचा अहवाल पीएओच्या संकेतस्थळावर आठ दिवसांत अपलोड करावे, असेही सांगितले होते.

पालकमंत्र्यांच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी निफाडच्या प्रांत अर्चना पठारे यांच्या नेतृत्वात चाैकशी समिती गठीत केली. संबंधित समितीच्या अधिकाऱ्यांनी नाफेडकडे खरेदीचे कागदपत्रे मागितली. मात्र, नाफेडचे सहायक व्यवस्थापन शैलेंद्र कुमार यांच्याकडून सदरची कागदपत्रे उपलब्ध करण्यास नकार दिला. खुद्द जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनीच तसे स्पष्ट केले आहे. नाफेडच्या अधिकाऱ्यांची ही मुजाेरी म्हणजे थेट पालकमंत्री व केंद्रीय राज्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टाेपली दाखविण्याचा प्रकार आहे. यानिमित्ताने खरेदीत मोठी अनियमितता असल्याचा संशय यावरून व्यक्त केला जात आहे.

आदेशाला लोटला पंधरवडा

पालकमंत्र्यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी निफाड प्रांत, कृषी पणन अधिकारी, बाजार समिती सचिव यांची चौकशी समिती गठीत केली. या समितीने नाफेडचे सहायक व्यवस्थापक शैलेंद्र कुमार यांची भेट घेत कांदा खरेदीची कागदपत्रे देण्यास सांगितले. परंतु, या समितीला केंद्रीय वाणिज्य विभागाच्या परवानगीशिवाय माहिती देता येणार नसल्याचे सांगत शैलेंद्र कुमार यांनी हात वर केले. त्यानंतर समितीने पत्रव्यवहार करूनही कागदपत्रे उपलब्ध झालेली नाहीत. विशेष म्हणजे आठवड्याभरात चाैकशी करायची असताना आता १५ दिवस लोटले तरी ती पूर्ण झालेली नाही.

हेही वाचा :

The post कांदा खरेदी चौकशीत नाफेडची मुजोरी, कागदपत्रे देण्यास टाळाटाळ appeared first on पुढारी.