काळ्या मातीचे संवर्धन करावे : बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा शेतकर्‍यांना सल्ला

राहीबाई पोपेरे

नाशिक पुढारी : वृत्तसेवा 
सद्यस्थितीत शेतकर्‍यांकडून सेंद्रिय शेतीऐवजी रासायनिक शेती केली जाते. हे प्रमाण आदिवासी भागात कमी असले, तरी भविष्यात त्याचे लोण पोहोचू शकते. पारंपरिक बियाणे जास्त पीक देऊ शकत नाहीत. मात्र, ते कमीत कमी विषारी पिकाच्या उच्च उत्पादनापेक्षा चांगले आहे. पारंपरिक बियाणांना खते किंवा कीटकनाशकांची गरज नसते. आदिवासी शेतकर्‍यांनी काळ्या मातीचे संवर्धन करावे, असे आवाहन बीजमाता राहीबाई पोपेरे यांनी केले.

शहरातील मनोहर गार्डन येथे आदिवासी विकास विभागातर्फे आयोजित राज्यस्तरीय जागतिक आदिवासी दिन सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव, आदिवासी विकास विभागाचे आयुक्त हिरालाल सोनवणे, आदिवासी विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक सिगला, नाशिक अपर आयुक्त संदीप गोलाईत, उपआयुक्त अविनाश चव्हाण, सुदर्शन नगरे, प्रकल्प अधिकारी वर्षा मीना, किरण माळी, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत आदी उपस्थित होते.

भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत आदिवासी समाजातील अनेक योद्ध्यांनी बलिदान दिले आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या विकासात आदिवासी समाजाचे मोठे योगदान राहिले आहे. राष्ट्रपतीच्या रूपाने आज देशाच्या सर्वोच्च स्थानी आदिवासी महिला विराजमान झाल्या आहेत. ही बाब कौतुकास्पद असल्याचे आदिवासी विकास विभागाचे सचिव अनुपकुमार यादव म्हणाले.

महाराष्ट्र राज्यात 10 टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे. राज्यात 47 जमाती अस्तित्वात असून, त्यांच्यासाठी शासनाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. त्या माध्यमातून आदिवासी समाजाची संस्कृती जपली जात आहे. आदिवासी समाजाला उत्तम शिक्षण व आरोग्य देण्यासह कुपोषण रोखण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सचिन यादव यांनी सांगितले. आदिवासी समाजाच्या प्रगतीसाठी शासन कटिबद्ध आहे. विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण व स्पर्धा परीक्षा अभ्यासासाठी नियोजन पद्धतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. तसेच आदिवासी समाजाला आर्थिक स्वावलंबी करण्यासाठी वैयक्तिक लाभाच्या योजना तयार करण्यात आल्या आहेत. आदिवासी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचवली जाईल, असे आयुक्त सोनवणे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा :

The post काळ्या मातीचे संवर्धन करावे : बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा शेतकर्‍यांना सल्ला appeared first on पुढारी.