Site icon

कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : राजाभाऊंचे आरोप अन् माणिकरावांचे खुलासे; प्रचार टोकाला

नाशिक (सिन्नर) : संदीप भोर
सिन्नर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शुक्रवारी (दि.28) मतदान होत आहे. तथापि, आमदार माणिकराव कोकाटे व माजी आमदार राजाभाऊ वाजे-युवा नेते उदय सांगळे यांच्या दोन पॅनल मध्ये खरी लढत होत आहे. यावेळी प्रथमच भाजप-मनसेने पॅनल निर्मितीचा घाट घातला. मात्र त्यांना पूर्ण पॅनल उभारणी करता आली नाही. त्यामुळे कोकाटे-वाजे या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आले असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असल्याने प्रचाराचा धुरळा चांगलाच उडालेला दिसत आहे.

गेल्या जवळपास 20 वर्षांपासून आमदार कोकाटे यांची बाजार समितीवर एकहाती सत्ता आहे. ती खेचण्यासाठी वाजे-सांगळे जोडी कामाला लागलेली आहे. ट्वेंटी-20 च्या सामन्यात एखाद्या बलाढ्य संघाने उभारलेला धावांचा डोंगर आणि त्याचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचा पहिलाच चेंडू सीमापार ठोकावा, अशा पध्दतीने वाजे-सांगळे गटाने यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीतील ‘इनिंग’ची सुरुवात केली आहे. गेल्या अनेक वर्षात आमदार कोकाटे यांच्या हाती सत्ता असल्याने त्यांच्या कारभारातील उणीवा शोधून त्या मतदारांच्या मनावर बिंबवल्या जात आहेत. या सगळ्यातून सुटका करायची असेल तर राजाभाऊ वाजे यांच्या हाती सत्ता देण्याचा संदेश पध्दतशीरपणे जनमानसात पोहचविण्याची खेळी वाजे गटाने खेळली आहे. आता उणीवा अर्थातच गैरकारभार म्हणून संबोधल्या जात आहे. कर्मचार्‍याचा खासगी सचिव म्हणून वापर, बाजार समितीच्या पेट्रोल पंपावरील कोकाटे यांच्या संस्थांची-समर्थकांची थकबाकी, शेतकर्‍यांची फसवणूक करणारा व्यापारी कारवाईविना मोकाट अशा नानाविध आरोपांची राळ उडविण्यात आली आहे. बाजार समितीचे सभापती म्हणून काम पाहिलेले नामदेव शिंदे यांच्यापाठोपाठ अरुण वाघ कोकाटे यांना सोडचिठ्ठी देऊन वाजे-सांगळे गटात सामिल झालेले आहेत. त्यामुळे बाजार समितीचा कारभार हाकताना त्यांनी अनुभवलेल्या, पाहिलेल्या बर्‍याच बारीकसारिक गोष्टी प्रचाराचा मुद्दा बनवून मतदारांसमोर मांडल्या जात आहेत. प्रचाराचा नारळ फुटण्याआधीच वाजे गटाचे शिलेदार गावागावात प्रचार करताना दिसून आले. त्यावरुन यंदाची निवडणूक रंगतदार तितकीच चुरशीची होणार असल्याचे जाणवत आहे.

तथापि, समोर कसलेला, अचानक गुगली टाकून फलंदाजाला गारद करुन डावात ‘ट्विस्ट’ निर्माण करणारा गोलंदाज अशा पध्दतीची आमदार कोकाटे यांची प्रतिमा आहे. त्यांच्या भेदक मार्‍याचा, गुगलीचा अंदाज विरोधकांना आहे. त्यामुळेच यंदाच्या निवडणुकीत आवश्यकतेनुसार चौकार, षटकार खेचताना आपले फलंदाज ‘क्लिन बोल्ड’ होणार नाही अशी सावध खेळी वाजे गट खेळताना दिसत आहे. आमदार कोकाटे यांनी आरंभी विकासाचे ‘व्हिजन’ मांडत प्रचाराचा नारळ वाढवला. आतापर्यंत केलेली शेतकरी हिताची कामे आणि येत्या काळात बाजार समितीचा विस्तार, शेतकर्‍यांना पुरवायच्या विविध सुविधा हा त्यांच्या प्रचाराचा मुद्दा होता. मात्र विरोधकांनी आरोपांचे ‘यॉॅर्कर’ टाकल्यानंतर बचावात्मक पवित्रा घेत कोकाटे यांनी हेच धोकादायक चेंडू सविस्तर खुलाशांच्या माध्यमाने तटविले आहेत. कर्मचार्‍याला स्वीय सहाय्यक म्हणून वापरण्यावर त्यांचा खुलासा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा कर्मचारी वैयक्तिक कामासाठी नव्हे तर बाजार समिती आणि शेतकरी हिताच्या कामांसाठी नाशिक, मुंबई, पुणे, नागपूर अशा विविध ठिकाणी पाठपुरावा करीत फिरला आणि त्यामुळे शेतकर्‍यांना फायदा झाल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. पेट्रोल पंप उभारणी, बाजार समितीवरील थकीत कर्जाची परतफेडीत व्याजात सूट, हिवरगाव येथील शासकीय जमीन बाजार समितीला खरेदी करण्यासाठीचा पाठपुरावा या कर्मचार्‍यानेच केल्याचे कोकाटे यांनी अधोरेखित केले आहे. पेट्रोल पंपाच्या थकबाकीदारांविरोधात दावे दाखल केल्याचे नमूद करुन विरोधकांच्या आरोपांचे खंडन केले आहे. शेवटच्या काही तासांमध्ये प्रचार टिपेला पोहचणार आहे.

आरोप-प्रत्यारोप, खुलाशांनी बाजार समितीची निवडणूक रंगतदार अवस्थेत पोहचली आहे. एका गटाने निवडणुकीआधीच मतदारांना पर्यटनाच्या निमित्ताने परगावी हलविल्याचीही चर्चा आहे. अशा मतदारांना थेट मतदानाला मतदान केंद्रावर आणण्याचे ‘प्लॅनिंग’ केले असल्याचे समजते. गुरुवारी (दि.27) सकाळी आठ वाजता प्रचार तोफा थंडावणार आहेत. त्यामुळे अवघे काही तास हातात असताना सर्वच उमेदवार कशी आणि किती ताकद लावतात आणि हा थरारक सामना आपल्या संघाला अर्थातच पॅनलला जिंकून देतात याकडे तालुकावासीयांचे लक्ष लागून आहे.

बाळासाहेबांच्या पक्षांतराचा फायदा निकालानंतरच कळेल
बाजार समिती निवडणुकीची माघारीची प्रक्रिया सुरू असताना राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ यांना आपल्या गोटात ओढून माजी आमदार वाजे यांनी आमदार कोकाटे यांना धक्का दिला. वाघ हे कोकाटे यांच्या पहिल्या फळीतील कार्यकर्ते होते. गेल्या 20-22 वर्षांच्या राजकीय वाटचालीत काही काळ अपवाद वगळता ते कोकाटे यांच्या सोबत राहीले. मात्र घुसमट सहन न झाल्याने शिवसेना ठाकरे गटात गेले आहेत. वाघासारखा कार्यकर्ता गळाला लागल्याने वाजे गटाचे मनोबल उंचावलेले आहे. वाघ यांच्याकडे कार्यकर्त्यांचा संच आहे. मात्र पक्षांतरावेळी त्यांच्यासोबत हा संच नव्हता. त्यामुळे त्यांच्या येण्याने वाजे गटात ‘बहार’ येते काय, हे निवडणूक निकालानंतरच कळणार आहे.

भाजप-मनसेचे ‘विमान’ घेणार का उड्डाण?
केंद्रात आणि राज्यात सत्ता असली तरी सिन्नरच्या राजकीय परिघात भाजपला उभारी मिळालेली नाही. यंदा तालुकाध्यक्ष भाऊसाहेब शिंदे, तालुकाप्रभारी जयंत आव्हाड यांनी निवडणुकीच्या निमित्ताने कोकाटे-वाजे यांच्या विरोधात पॅनलची बांधणी करण्याचा प्रयत्न केला. पॅनलनिर्मिती करताना मनसे, आरपीआय, प्रहार यांनाही सोबत घेतले आहे. 18 पैकी केवळ सात जागांवर उमेदवार देता आले आहेत. श्री बळीराजा पॅनलच्या उमदेवारांना ‘विमान’ निशाणी मिळाली आहे. मातृशोक झाल्यानंतरही भाऊसाहेब शिंदे प्रचाराचे नियोजन करताना दिसले. भाजप-मनसेचे ‘विमान’ कितपत उड्डाण घेते हे पाहावे लागेल.

हेही वाचा:

The post कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक : राजाभाऊंचे आरोप अन् माणिकरावांचे खुलासे; प्रचार टोकाला appeared first on पुढारी.

Exit mobile version