कॅन्टोन्मेंट प्रशासन : अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मांडली रस्त्यातील खड्ड्यांची व्यथा

देवळाली www.pudhari.news

नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा

रस्त्यावर पडलेले खड्डे प्रशासनाने तातडीने बुजवावेत यासाठी कवीने चक्क कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवून खड्ड्यांची व्यथा व वाहनधारकांची होणारी दैना मांडली आहे. सोशल मीडियात हे पत्र प्रचंड व्हायरल झाल्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डाला जाग येऊन संबधित अधिकारी तातडीने रस्ता दागडूगजीचे काम हाती घेईल, अशी अपेक्षा त्रस्त वाहनधारक व्यक्त करत आहेत.

देवळाली कॅम्प परिसरातील लॅम रोड व कॉलनी रस्त्यांची अतिशय वाईट अवस्था आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे हे अपघाताला कारणीभूत ठरत आहे. कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून रस्त्याची डागडुजी तसेच डांबरीकरण करणे आवश्यक होते. मात्र त्याकडे अधिकारी वर्ग सपशेल दुर्लक्ष करीत असल्यामुळे रस्त्यावरील खड्डे दिवसेंदिवस वाढत आहेत. याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवणे सर्वांना अपेक्षित होते. परंतु, सध्या कॅन्टोन्मेंट क्षेत्रात प्रशासकीय राजवट लागू आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींच्या सूचनांकडे संबंधित अधिकारी वर्ग दुर्लक्ष करताना दिसतात. खड्ड्यांमुळे पाठीच्या मणक्याचे आजार तसेच श्वसनाचे विकारही जडत असल्याच्या तक्रारी वाहनधारकांच्या आहे. याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी येथील एका कवीने वाहनधारकांच्या मनातील व्यथा जाहीर पत्रातून मांडली आहे. यामागे कॅन्टोन्मेंट अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून रस्त्याचे काम तातडीने पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. त्यामुळे आता सर्व देवळाली कॅम्प परिसरातील वाहनधारक तसेच नागरिकांना कॅन्टोन्मेंट विभागातील अधिकारी वर्ग काय निर्णय घेतात, याविषयी उत्सुकता आहे.

असा आहे पत्रातील मजकूर….

पत्रप्रपंच

प्रति,

देवळाली कॅम्प कॅन्टोन्मेंट बोर्ड व सर्वच लोकप्रतिनिधी

किती फोडा हंबरडे… आमचे मोडतेय कंबरडे

आम्हाला आता खरंच चांगले रस्तेच नको… कोणत्याही शहराच्या विकासासाठी रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र देवळालीतील सर्वच रस्त्यांची स्थिती आपणास माहितच आहे. केवळ देवळालीवासीयच नव्हे तर देशभरातून येथे पर्यटक येतात. त्यामुळे लॅमरोड, रेस्ट कॅम्प रोड शहरांर्तगत रस्त्यावरून चालतांना आम्हाला अभिमान वाटतोय. आर्थिक संकटाच्या चक्रात सापडलेले सुस्त कॅन्टोन्मेंट प्रशासन लक्ष देत नाही. एकमेव असलेल्या जनतेच्या कैवारी असलेल्या ताईसाहेबही दिसेनात. माजी नगरसेवकांना काही घेणे देणे नाही. त्यात आजी माजी व भावी लोकप्रतिनिधी यांसह अनेक गावचे पुढारी राजकारण करण्यासाठी आमचा वापर…

करतात. किती फोडा हंबरडे… आमचे मोडतेय कंबरडे अशी सर्वसामान्यांची स्थिती झाली आहे.

त्यामुळे आम्हाला आता चांगले रस्तेच नकोय कारण रस्ते चांगले झाले तर आमच्या गाड्या सुसाट जातील अन उगाचच अपघात वाढतील. त्यामुळे आमच्यासाठी आता खरंच, आम्हाला चांगले रस्ते नकोय…हेच सांगायचय… असो आपण सर्व सुज्ञ आहात.

इति लेखनसीमा

एक सुज्ञ नागरिक

हेही वाचा:

The post कॅन्टोन्मेंट प्रशासन : अधिकाऱ्यांना पत्र पाठवून मांडली रस्त्यातील खड्ड्यांची व्यथा appeared first on पुढारी.