कोजागरी पौर्णिमा : इस्कॉनमध्ये रंगला कोजागरी पौर्णिमेचा सोहळा

Iskon www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघा (इस्कॉन)तर्फे कोजागरी म्हणजेच शरद पौर्णिमा जल्लोषात साजरी करण्यात आली.

शरद पौर्णिमेनिमित्त मंदिराची तसेच श्री राधा-कृष्णाच्या विग्रहाची सुंदर सजावट करण्यात आली होती. वेदीवर वृंदावनातील नयनरम्य देखावा प्रस्तुत करण्यात आला होता. श्रीकृष्णाने गोपींसमवेत रासलीला ज्या ठिकाणी केली होती, त्याचीच प्रतिकृती मंदिरात उभी करण्यात आली होती. ज्यामध्ये चंद्र, झाडे, वेली, फुले, सरोवर, प्राणी, पक्षी, ढग, विविध प्रकारचे वाद्य देखाव्यात तयार करण्यात आले होते. महोत्सवाला सकाळी पाचला मंगल आरतीपासून सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण महामंत्र जप, दर्शन आरती, व श्रीमान शिक्षाष्टकं प्रभूंचे भागवत प्रवचन झाले. त्यांनी कार्तिक महिन्यात येणाऱ्या सर्व महोत्सवाची माहिती दिली. तसेच ऊर्जा व्रताचे वर्णनदेखील केले.  सायंकाळी ६ पासून कीर्तनाला प्रारंभ करण्यात आला व नयनरम्य दर्शनाचा तसेच ‘शरद पौर्णिमेचे महत्त्व’ या विषयावरील श्रीमान शिक्षाष्टकं प्रभूंच्या प्रवचनाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला. याच दिवसापासून कार्तिक मासदेखील प्रारंभ होतो व त्यालाच दामोदर मास असेदेखील म्हणतात. कारण याच महिन्यात येणाऱ्या दिवाळीला भगवान श्री कृष्णाची दामोदर लीला झाली होती. संपूर्ण कार्तिक महिना हा अनेक उत्सवांनी सज्जित आहे व इस्कॉन मंदिरात हे महोत्सव अतिशय जल्लोषात साजरे केले जाणार आहेत. त्यात ९ ऑक्टो.- शरद पौर्णिमा, २१ ऑक्टो. – रमा एकादशी, २४-२५ ऑक्टो. – दीपावली, २६ ऑक्टो. – गोवर्धन पूजा, १ नोव्हें. – गोपाष्टमी, ४ नोव्हें. – कार्तिक उत्थान एकादशी, ८ नोव्हें. – कार्तिक पौर्णिमा व दीपोत्सव आहेत.

शरद पौर्णिमा महोत्सवाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन दास, गोपालानंद प्रभू, नादिया कुमार प्रभू, मारुती प्राण प्रभू, मुकुंद रस प्रभू, सरस कृष्ण प्रभू, सार्वभौमकृष्ण प्रभू, भगवान नरसिंह प्रभू, लीलाप्रेम प्रभू, सुमेध पवार, अक्षय एडके, सत्यभामा कुमारी माताजी, प्रेम शिरोमणी माताजी आणि इतर कृष्णभक्तांनी अथक परिश्रम घेतले. संपूर्ण महिनाभर दररोज सकाळी ८ वाजता व सायंकाळी ७.३० वाजता दामोदर अष्टकम व भगवान श्री राधा आणि कृष्णाला दीप अर्पण करण्याची तसेच महाप्रसादाची संधी भाविकांनी घ्यावी, असे आवाहन मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे.

हेही वाचा:

The post कोजागरी पौर्णिमा : इस्कॉनमध्ये रंगला कोजागरी पौर्णिमेचा सोहळा appeared first on पुढारी.