कोराेनात “कॉलेज टीचर्स’ संकटमोचक ठरली : शरद पवार

शरद पवार,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्हा कॉलेज टीचर पतसंस्थेने कोराेना काळात संकटात सापडलेल्या सेवकांना व कुटुंबाला मदत करून चांगला पायंडा घालून दिला आहे. त्यामुळे ही संस्था कोरोनात खऱ्या अर्थाने संकटमोचक ठरली. भविष्यातही संस्थेने उत्तमोत्तम कार्य करून संस्था समाजहिताची अखंडपणे जपणूक करण्याची गरज आहे. विविध संस्थांनी सभापदाचे हित जोपासण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांनी केले.

शहरातील धनदाई लॉन्स येथे नाशिक जिल्हा कॉलेज टीचर पतसंस्थेच्या नूतन वास्तूच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे होते. व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, आमदार दिलीप बनकर, ॲड. माणिक कोकाटे, माजी आमदार हेमंत टकले, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पगार, पतसंस्थेचे संस्थापक व्ही. आर. रसाळ, पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. नानासाहेब दाते उपस्थित होते.

महाराष्ट्रात काही मोजक्या शैक्षणिक संस्था आहे. ज्यांनी सर्वसामान्यांसह विद्यार्थ्यांच्या हिताची जपणूक केली. त्यामध्ये रयत शिक्षण संस्था, शिवाजी एज्युकेशन व मविप्र समाज संस्था यांचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल. मविप्र संस्था सांभाळणाऱ्या संचालक मंडळाएवढीच शिक्षकांची व सेवकांचीदेखील संस्थेसोबत प्रचंड बांधिलकी आहे. संस्थेने जिल्ह्याच्या सामाजिक, सार्वजनिक क्षेत्रात योगदान दिलेले असून, संस्थेच्या संस्थापकांनी प्रसंगी सामान्य माणसाच्या हिताच्या प्रश्नासाठी संघटनेसोबत संघर्ष करण्यासदेखील मागे-पुढे पाहिलेले नसल्याचे खा. पवार यांनी सांगितले.

जिल्हा कॉलेज टीचर संस्था ही शिक्षकांच्या आर्थिक चिंता दूर करणारी आगळीवेगळी काम उभे करणारी संस्था आहे. कोरोना काळात सेवकांची कोट्यवधी रुपयांची कर्जमाफी केली. योग्य आर्थिक नियोजन आणि काटकसरीमुळे हे शक्य झाले असल्याचे मविप्र सरचिटणीस ॲड. ठाकरे यांनी सांगितले. तर प्रास्ताविकात प्रा. दाते यांनी ७ टक्के दराने ठेवी व कर्जवाटप करणारी एकमेव संस्था असून, सभासदांची २५ लाखांपर्यंत कर्जमाफी केल्याचे सांगितले.

जिल्ह्यातील सहकारी संस्था अडचणीत : भुजबळ

जिल्ह्यात सहकारी संस्था अडचणीत असताना सहकारी संस्था टिकवणे, मोठी करणे ही उजाड माळरानावर नवीन निर्माण करण्यासारखी उल्लेखनीय बाब आहे. जिल्हा कधी काळी सहकार क्षेत्रात अग्रेसर होताा. मात्र, आता सहकारी संस्था अडचणीत आल्या आहेत. याला राजकीय नेत्यांचा पराक्रम कारणीभूत असल्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

हेही वाचा :

The post कोराेनात "कॉलेज टीचर्स' संकटमोचक ठरली : शरद पवार appeared first on पुढारी.