कोरोना पॉझेटीव्ह नेपाळी महिलेच्या प्रसुतीसाठी डॉक्टरांचा नकार, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार

नाशिकरोड, पुढारी वृत्तसेवा : खर्जुल मळा परिसरात वास्तव्यास असलेल्या एका नेपाळी महिलेच्या प्रसुतीसाठी नाशिकरोडच्या बिटको रुग्णालयातील डॉक्टरांनी नकार दर्शविला. प्रसुतीसाठी आलेल्या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे कारण पुढे करुन हा नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसेनेच्या माजी नगरसेविका जयश्री खर्जुल यांनी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, महापालिका आयुक्त यांच्याकडे संबधित डॉक्टरांवर कायदेशीर कारवाई करण्याच्या मागणीचे निवेदन दिले.

माजी नगरसेविका खर्जुल यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, दि . 22 रोजी रात्री दहा वाजता नेपाळी महिला मिश्रा थलराज डांगी हीला बिटको रुग्णलयात प्रसुतीकरीता दाखल केले, त्यावेळी डॉक्टरांनी महिलेची अँटीजन तपासणी केली असता या महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. त्यामुळे तेथील डॉक्टरांनी आपल्याकडे कोरोना पॉझिटीव्ह रुग्णाची प्रसुती करण्याची सुविधा उपलब्ध नाही, शिवाय दोन गर्भ असल्याने तुम्ही त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करावे, असे कळविले.

यावेळी नितीन खर्जुल यांनी महिलेची आर्थिक परिस्थिती गरीब असल्याने येथेच प्रसुती करावी, अशी विनंती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापुरसाहेब नागरगोजे यांच्याकडे केली. मात्र त्यांनी आपल्याकडे सुविधा उपलब्ध नसल्याने नकार दर्शविला. शेवटी खर्जुल यांनी नेपाळी महिलेला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे महिलेची सुखरुप प्रसुती होऊन नेपाळी महीलेने दोन जुळ्या बाळांना जन्म दिला.

मागील दोन वर्षापासून कोव्हीड पॉझिटीव्ह रुग्णांची प्रसुती सुविधा जिल्हा शासकीय रुग्णालयात केली आहे. बिटकोत आपण सुविधा नाही, पॉझिटीव्ह महिलेची बिटकोत प्रसुती केली तर इतर महिलांची प्रसुती बिटकोत कशी करणार एवढीच एक समस्या होती.
– डॉ . बापुसाहेब नागरगोजे , महापालिका वैद्यकीय अधिकारी

The post कोरोना पॉझेटीव्ह नेपाळी महिलेच्या प्रसुतीसाठी डॉक्टरांचा नकार, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे तक्रार appeared first on पुढारी.