Site icon

क्रेडिबिलिटी’ असणाऱ्यांनाच उत्तर देतो, वरुण सरदेसाई यांचा नितेश राणेंना टोला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

‘क्रेडिबिलिटी असणाऱ्या व्यक्तीला उत्तर द्यायचे असते. ज्याला जे बोलायचे, ते बोलू द्या. कुणीही उठून काहीही बोलेल, सगळ्याच गोष्टींना उत्तरे द्यायची नसतात’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे युवानेते वरुण सरदेसाई यांनी भाजप नेते आमदार नितेश राणे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यात संजय राऊत शकुनी, तर वरुण सरदेसाई आदित्य ठाकरे यांच्या आयुष्यातील शकुनी असल्याची टीका नितेश राणे यांनी केली होती.

युवासेना, युवती सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखतींसाठी वरुण सरदेसाई नाशिक येथे आले असता, पत्रकारांशी बोलताना त्यांनी राणे यांना जशास तसे उत्तर दिले. यावेळी आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय राहुल कनाल यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याबाबत सरदेसाई यांना विचारले असता ते म्हणाले, शिवसेनेत अनेकांना वेगवेगळ्या पदांवर संध्या देण्यात आल्या आहेत. राहुल कनाल यांनादेखील शिर्डी साई संस्थान, महानगरपालिकेच्या शिक्षण समितीवर संधी दिली गेली. आदित्य ठाकरे यांनी संधी दिल्यानेच ते युवानेते झाले. नेते झाले म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला का?, असा सवाल सरदेसाई यांनी उपस्थित केला. महामोर्चाबाबत ते म्हणाले की, शिवसेना आणि युवासेनेच्या वतीने शनिवारी, मुंबई महापालिकेवर मोर्चा काढण्यात येणार आहे. हा महामोर्चा असून, त्यात शिवसैनिक आणि सामान्य नागरिकसुद्धा सहभागी होणार आहेत. एकही निवडणूक घेतली जात नाही. आदित्य ठाकरे एक एक घोटाळा बाहेर काढत आहेत. त्यामुळेच भाजपही मोर्चा काढत आहे. पण, तो त्यांचा निर्णय असल्याचे सरदेसाई म्हणाले.

ठाकरे गटाचे नेते सूरज चव्हाण यांच्या घरी ईडीने झाडाझडती घेतली, याबाबत सरदेसाई म्हणाले की, सूरज हे माझे जवळचे सहकारी आहेत. शिवसेनेचे निष्ठावंत वाघ आहेत. ते चौकशीला सामोरे जात आहेत. संघटनेचे कामदेखील सुरू आहे. भाजपवर जे बोलत आहे, त्यांच्यावरच धाडी पडत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

मंत्रिपदासाठी बुटाची लेस बांधून तयार

शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले. मात्र, अशातही मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नाही. हे त्यांचे अपयश आहे. एकाला मंत्रिपद दिल्याने, इतरही बुटाची लेस बांधून तयार आहेत. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराच्या नावे फक्त वेगवेगळ्या तारखा दिल्या जात आहेत. काहींचे सुट कपाटातच खराब झाले आहेत, अशा शब्दांत सरदेसाई यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरून शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली.

हेही वाचा : 

The post क्रेडिबिलिटी' असणाऱ्यांनाच उत्तर देतो, वरुण सरदेसाई यांचा नितेश राणेंना टोला appeared first on पुढारी.

Exit mobile version