खानदेश महोत्सव : आज शंकर महादेवन यांची उपस्थिती, खानदेश रत्न पुरस्काराच्या वितरणाने होणार समारोप

खानदेश महोत्सव www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा
खानदेश महोत्सवाचा तिसरा दिवस शालेय विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांच्या प्रदर्शनाने जल्लोषात साजरा झाला. सायंकाळी सिनेमा व टीव्ही कलाकारांच्या धमाल विनोदी प्रहसनांच्या सादरीकरणाने, मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या नायिका मानसी नाईक आणि सुवर्णा काळे यांच्या अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली. रविवारी (दि. 25) गायक शंकर महादेवन यांच्या मैफलीने आणि खानदेश रत्न पुरस्कार वितरणाने या महोत्सवाचा समारोप होणार आहे.

आमदार सीमा हिरे यांनी आयोजित केलेल्या खानदेश महोत्सवात शनिवारी (दि. 24) दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक व समूह नृत्य स्पर्धेमध्ये वैयक्तिक गटात 30 स्पर्धकांनी, तर समूह नृत्य गटात 28 शाळांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. समूह नृत्य प्रकारात त्र्यंबकेश्वरच्या कस्तुरबा गांधी बालिका आश्रमाच्या विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ‘विठ्ठल रुक्माई’ या गाण्यावरील नृत्याला प्रथम क्रमांक देण्यात आला. गुरुगोविंद सिंग इंग्लिश मीडियम स्कूलच्या भांगडा नृत्याला द्वितीय क्रमांक, तर सागर डान्स अकॅडमीच्या गोंधळ आणि ‘भाऊ मना सम्राट’ या गाण्यावरील नृत्याला तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. शालिनीताई बोरसे विद्यालयाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले. वैयक्तिक गटात अक्षता देशमुखने सादर केलेल्या ‘पिकल्या पानावर’ गीतावरील नृत्याला प्रथम, कावेरी मोराडे हिला द्वितीय, सान्वी पगारने सादर केलेल्या ‘चंद्रा’ गाण्यावरील नृत्याला तृतीय, तर हृषिकेश देशमुख या विद्यार्थ्याला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. या सर्व विजेत्या शाळा व विद्यार्थ्यांना आमदार सीमा हिरे, स्वामी समर्थ गुरुपीठाचे माउली अण्णासाहेब मोरे, इस्पॅलियर स्कूलचे संचालक सचिन जोशी, मराठा मुद्रा फाउंडेशनच्या प्रतिभा होळकर, व्यापारी आघाडीचे निखिल पवार, भाजपचे नेते महेश हिरे, रश्मी हिरे-बेंडाळे यांच्या हस्ते बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. सायंकाळी मराठी सिनेसृष्टीतील विनोदी अभिनेते भारत गणेशपुरे, योगेश शिरसाठ आणि हेमांगी कवी यांच्या विनोदी प्रहसनाच्या सादरीकरणाने उपस्थितांचे हसून हसून पुरेवाट होईपर्यंत मनोरंजन केले. त्यानंतर प्रसिद्ध नृत्यांगना मानसी नाईक आणि सुवर्णा काळे यांच्या अदाकारीने उपस्थितांची मने जिंकली. यानंतर इंडो वेस्टर्न फॅशन शो पार पडला.

हेही वाचा:

The post खानदेश महोत्सव : आज शंकर महादेवन यांची उपस्थिती, खानदेश रत्न पुरस्काराच्या वितरणाने होणार समारोप appeared first on पुढारी.