खासदार हेमंत गोडसे : ब्लॅक स्पॉटचे तातडीने डीपीआर तयार करा

khasdar godse www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील एकूण ब्लॅक स्पॉटचे मेजर, मीडियम आणि मायनर या सदराखाली वर्गीकरण करून तातडीने डीपीआर तयार करण्याच्या सूचना संसदीय सदस्य रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष खा. हेमंत गोडसे यांनी केल्या.

संसदीय सदस्य रस्ता समितीची बैठक समिती अध्यक्ष खा. गोडसे आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. यावेळी मार्गदर्शन करताना खा. गोडसे यांनी वरील सूचना दिल्या. याप्रसंगी जिल्हाधिकारी डी. गंगाथरन व सहायक जिल्हाधिकारी जतिन रहेमान, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, पोलिस अधीक्षक शहाजी उमप, महानगरपालिका उपआयुक्त अर्चना तांबे, प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे भाऊसाहेब साळुंके, दिलीप पाटील, प्रशांत देशमुख, गणेश मिसाळ आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावर 43, राज्य मार्गांवर 35 इतर रस्त्यांवर 52, नाशिक पोलिस आयुक्तालय हद्दीत 23, तर नाशिक ग्रामीण हद्दीत 43 ब्लॅक स्पॉट असल्याची माहिती समोर आली आहे. अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी येत्या 15 डिसेंबर 2022 पर्यंत सर्वच ब्लॅक स्पॉटवर साइन बोर्ड, कॅटआय, साइडपट्ट्या, कॅमेरे, हायमास्ट, पथदिपे बसवावेत, अन्यथा कठोर कार्यवाही करण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी खा. गोडसे यांनी दिला आहे. शाळकरी विद्यार्थ्यांना ने-आण करण्यासाठी असलेल्या रिक्षा आणि बसेसमध्ये प्रमाणापेक्षा अधिक विद्यार्थी असतात. जिल्ह्यात सर्वत्र अवैध वाहतुकीचे प्रमाण वाढले असून, याला पायबंद बसणे गरजेचे आहे. इंदिरानगर, द्वारका, राणेनगर, मुंबई नाका येथील वाहतूक कोंडीवर लवकरात लवकर तोडगा काढण्याच्या सूचना खा. गोडसे यांनी करत वेगाने वाहने चालविणार्‍या व ओव्हरटेक तसेच लेन कटिंग करणार्‍यांवर कठोरात कठोर कार्यवाही करण्याचे आदेश खा. गोडसे यांनी दिले आहेत.

हेही वाचा :

The post खासदार हेमंत गोडसे : ब्लॅक स्पॉटचे तातडीने डीपीआर तयार करा appeared first on पुढारी.