गिरीश महाजन बालिश आहेत, एकनाथ खडसेंची टीका

खडसे-महाजन,www.pudhari.news

जळगाव : राज्यात नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीत एकनाथ खडसेंना राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली, यात ते विजयी झाले पण त्यांचे सरकार गेले. त्यामुळे सोशल मीडियावर खडसेंवर विनोद होत आहेत. या विनोदाचा आधार घेऊन भाजप नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर टीका केली होती. त्या टीकेला आता खडसेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

गिरीश महाजनांनी एकनाथ खडसेंना टोला लगावला होता. खडसेंची अवस्था म्हणजे, मंदिरात गेले अन् प्रसाद संपला तर बाहेर आले अन् चप्पल चोरीला गेली अशी झाली, अशी टीका गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर केली होती. महाजन यांच्या टीकेला एकनाथ खडसे यांनी खोचक शब्दांत उत्तर दिलं आहे. गिरीश महाजन यांनी केलेल्या टीकेबाबत खडसेंना विचारल्यावर त्यांनी गिरीश महाजन बालिश आहेत, असं म्हणत टोला लगावला आहे.

महाजनांना मीच राजकारणात आणलं

एकनाथ खडसे म्हणाले की, “गिरीश महाजनांना मीच राजकारणात आणलं. पहिल्यांदा त्यांना मीच आमदार म्हणून निवडून आणलं. गिरीश महाजन बालिश आहेत, प्रगल्भ विचारांचे नाहीत. त्यांनी आयुष्यभर माझ्या पादत्राणांची सेवा केली, आज माझ्या पादत्राणांची आठवण झाली आहे. माझे पादत्राणे घेऊनच ते मत मागायचे, त्यामुळे स्वाभाविकपणे त्यांचे माझ्या पादत्राणाकडे अधिक लक्ष असतं. पण, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही,” अशी बोचरी खडसे यांनी केली.

गिरीश महाजनांनी केली होती टीका

एकनाथ खडसे महाविकास आघाडीत आले आणि सरकार कोसळले, अशा प्रकारच्या सोशल मीडियावरील विनोदाचा आधार घेत त्यांनी आमदार खडसेंवर टीका केली होती. “एकनाथ खडसे यांना आमदारकीवरच समाधान मानावे लागणार आहे. मंदिरात गेले तर प्रसाद संपला अन् बाहेर आले तर चप्पल चोरीला गेली, अशी त्यांची स्थिती झाली आहे,” अशी बोचरी टीका गिरीश महाजन यांनी केली होती.

हेही वाचा :

The post गिरीश महाजन बालिश आहेत, एकनाथ खडसेंची टीका appeared first on पुढारी.