गुलाबाचं झाड माझ्याकडे, जळगावात पुन्हा नवीन गुलाब फुलवेन : उद्धव ठाकरे

उद्धव ठाकरे, गुलाबराव पाटील

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकार्‍यांनी आज मुंबईत ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीप्रसंगी जिल्ह्यातील शिवसेनेच्या बंडखोर आमदारांचा ठाकरे यांनी समाचार घेतला. विशेषत: माजी मंत्री गुलाबराव पाटील यांच्यावर प्रखर टीका करताना गुलाबराव पाटलांना आता काटे दाखवणार असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी केली.

बैठकीला शिवसेना संपर्कप्रमुख संजय सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे, शिवसेना जिल्हाप्रमुख हर्षल माने, शिवसेना जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, शिवसेना महानगरप्रमुख शरद तायडे, उपमहानगरप्रमुख प्रशांत सुरवडकर, महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, वैशाली सूर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी पदाधिकार्‍यांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी विरोधकांसह बंडखोरांवर जोरदार टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, परवा भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी बोलून दाखवलं की, शिवसेना संपत चाललेला पक्ष आहे. त्यांना माहिती नाही की, अशी आव्हाने पायदळी तुडवत त्याच्यावर आम्ही भगवा झेंडा रोवला आहे. राजकारणात हार-जीत होत असते, पण संपवण्याची भाषा केली जात नाही. ती आता होतेय, असे ठाकरे म्हणाले.

जळगावात पुन्हा नवीन गुलाब फुलवेन…

सध्या ज्यांना मी मोठं केलं, ते आपल्या सोबत नाहीत. पण त्यांना मोठे करणारे तुम्ही सगळे माझ्यासोबत आहात. तुमच्याच ताकदीवर आपण त्यांना धडा शिकवू. पण आज मी निक्षून सांगतो, आतापर्यंत त्यांनी गुलाब पाहिले. आता काटे पाहा. गुलाबाचं झाड माझ्याकडे आहे. पुन्हा नवीन गुलाब फुलवेन, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
शिवसेना ही आपलीच… : शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराने काम करते. काही गद्दार आज शिवसेनेच्या विरोधात कारवाई करत आहेत. आपला न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. शिवसेना ही आपलीच आहे. आता जरी वाईट काळ आला असला, तरी मला तुम्हा सर्व शिवसैनिकांची गरज आहे.

हेही वाचा :

The post गुलाबाचं झाड माझ्याकडे, जळगावात पुन्हा नवीन गुलाब फुलवेन : उद्धव ठाकरे appeared first on पुढारी.