गोड खबरबात : महापालिकेत दिवाळीनंतर नोकरभरतीचा बार!

नाशिक महानगरपालिका www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतील अग्निशमन विभागांतर्गत फायरमनची 208 पदे तसेच वैद्यकीय विभागातील 350 आणि अत्यावश्यक सेवेतील अभियंत्यांची काही पदे पहिल्या टप्प्यात भरली जाणार असून, गुरुवारी (दि.20) मंत्रिमंडळाच्या बैठकीत टीसीएस आणि आयबीपीएस संस्थांमार्फत भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याने भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे.

नोकरभरतीसंदर्भात सेवा प्रवेश नियमावलीस अंशत: मंजुरी मिळाल्याने आणि आस्थापना खर्चातही शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने भरतीचा बार दिवाळीनंतर उडण्याचे निश्चित झाले आहे. नाशिक शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत असल्याने वाढत्या लोकसंख्येला मूलभूत सेवा सुविधा पुरविण्यासाठी महापालिकेकडील मनुष्यबळ अपुरे पडू लागले आहे. गेल्या 24 वर्षांपासून नाशिक महापालिकेत भरती झालेली नाही. नाशिक महापालिकेचा ‘ब’ संवर्गात समावेश होऊन आठ वर्षे उलटली असली तरी जुन्या ‘क’ संवर्गानुसारच आस्थापना परिशिष्ट कार्यरत आहे. आस्थापना परिशिष्टावरील मंजूर 7,082 पदांपैकीही तब्बल 2,700 पदे आजमितीस रिक्त असल्याने जेमतेम 4,400 अधिकारी, कर्मचार्‍यांमार्फत महापालिकेला प्रशासकीय कारभाराचा गाडा हाकावा लागत आहे. आस्थापना खर्च 35 टक्क्यांवर गेल्यामुळे महापालिकेला रिक्तपदांच्या भरतीलादेखील शासनाकडून परवानगी मिळत नव्हती. कोरोना काळात आपत्कालीन परिस्थितीत आरोग्य, वैद्यकीय आणि अग्निशमन विभागातील 875 नवीन पदांना शासनाने मंजुरी दिली होती. परंतु, सेवा प्रवेश नियमावली मंजूर नसल्याने या पदांच्या भरतीला अडथळा निर्माण झाला होता. महापालिकेने पाठपुरावा केल्यानंतर नियमावलीला शासनाने अंशत: मंजुरी दिली असून, अग्निशमन विभागातील फायरमनची 208, आरोग्य-वैद्यकीय विभागातील 350 पदे तसेच अभियंत्यांची काही महत्त्वाची भरती केली जाणार आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गट-ब (अराजपत्रित), गट क व गट ड संवर्गातील पदांसाठी टीसीएस, आयबीपीएसमार्फत भरतीप्रक्रिया राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भरती प्रक्रियादेखील टीसीएस, आयबीपीएसमार्फत राबविण्यात येणार असल्याचे प्रशासन (उपआयुक्त) मनोज घोडे-पाटील यांनी सांगितले.

आकृतिबंधाबाबत अहवाल देणार…
महापालिकेचा 14 हजार पदांचा सुधारित आकृतिबंध शासन दरबारी मान्यतेसाठी सादर करण्यात आला आहे. हा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून, आता पाठपुराव्यानंतर त्यास चालना मिळाली आहे. त्यानुसार शासनाच्या निर्देशानुसार सुधारित आकृतिबंधातील नव्या पदांच्या निर्मितीमागील कारणमीमांसा अहवाल सादर करण्यात येणार आहे. सुधारित आकृतिबंधामध्ये काही पदसंख्येत फेरबदल होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा:

The post गोड खबरबात : महापालिकेत दिवाळीनंतर नोकरभरतीचा बार! appeared first on पुढारी.