ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध

नाशिक www.pudhari.news

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा
चांदवड तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि. 7) 46 उमेदवारांनी माघार घेतल्याने 108 उमेदवार सरपंचपदाच्या रिंगणात उतरले आहेत. तर सदस्यपदासाठी प्राप्त झालेल्या 737 अर्जांपैकी 141 उमेदवारांनी माघार घेतल्याने 507 सदस्य निवडणुकीस सामोरे जाणार आहेत. तालुक्यातील दोन सरपंच व 83 सदस्य बिनविरोध निवडून आल्याची माहिती तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली. माघारीच्या दिवशी गावागावांतील राजकीय मंडळींनी स्वतःचा मार्ग मोकळा करण्यासाठी इतरांवर दबाव आणून अर्ज माघार घेण्यास भाग पाडले. तर काही ठिकाणी यश न आल्याने त्या ठिकाणच्या निवडणुका या चुरशीच्या अन् प्रतिष्ठेच्या होणार आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराची माघार करण्यासाठी साम, दाम, दंड, भेद याचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आला. माघारीच्या दिवशी येथील उपविभागीय प्रांत कार्यालयात जत्रेचे स्वरूप आले होते. सरपंचपदासाठी काही ठिकाणी दुहेरी, तिहेरी, चौरंगी लढती होणार आहेत. निवडणुकांमध्ये विजयी होणार्‍या उमेदवारास आगामी बाजार समितीच्या निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार प्राप्त होणार आहे. तसेच काही उमेदवार हे बाजार समितीच्या निवडणुकीत उतरणार असल्याने त्यांच्यासाठी ग्रामपंचायतीची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची ठरणार आहे.

नारायणगावमध्ये सर्वच बिनविरोध
नारायणगाव ग्रामपंचायतीची सरपंच व सदस्यपदाची निवडणूक बिनविरोध झाली. दूधखेड ग्रामपंचायतीचे सरपंचही बिनविरोध ठरले आहेत. तेथील सदस्याच्या एका जागेवर वाद झाल्याने एका जागेसाठी निवडणूक घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत निवडणूका : चांदवडला दोन सरपंच, 83 सदस्य बिनविरोध appeared first on पुढारी.