ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात १८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान

ग्रामपंचायत प्रभाग

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील चार तालुक्यांमधील १८७ ग्रामपंचायतींसाठी रविवारी (दि.१६) मतदान घेण्यात येत आहे. मतदानासाठी एकूण ६११ केंद्रे अंतिम करण्यात आली आहे. तब्बल दोन लाख ७६ हजार ९२१ मतदार त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ आणि सुरगाणा या तालुक्यांमध्ये ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० यावेळेत मतदान होणार आहे. त्यासाठी मतदान केंद्र अधिकारी व कर्मचारी हे शनिवारी (दि.१५) दुपारीच ईव्हीएम आणि मतदान साहित्यासह केंद्राकडे रवाना झाले. प्रशासनाने इगतपुरीत १५, पेठला २११, त्र्यंबकमध्ये १६९ आणि सुरगाण्यात २१६ मतदान केंद्रे अंतिम केली आहेत. चारही तालुक्यांमधील १ लाख ३५ हजार २४३ स्त्री आणि १ लाख ४१ हजार ६७८ पुरुष मतदार हे मतदान करणार आहेत. दरम्यान, यंदा थेट नागरिकांमधून सरपंचाची निवड केली जाणार असल्याने निवडणुकीत चुरस पाहायला मिळते आहे. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी मागील १५ दिवस संपूर्ण गाव पिंजून काढला आहे. यावेळी आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. त्यामुळे मतदारांची पसंती कोणाला मिळाली याचा फैसला सोमवारी (दि.१७) मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.

या ग्रामपंचायतीसाठी होत आहे मतदान…

पेठ ६९

सुरगाणा ५९

इगतपुरी ०५

त्र्यंबकेश्वर ५४

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात १८७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान appeared first on पुढारी.