ग्रामपंचायत निवडणूक नाशिक : माघारीच्या दिवशीच उडाला विजयाचा गुलाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील १९६ ग्रामंपचायतींच्या निवडणुकीचा धुरळा उडणार आहे. मात्र, माघारीच्या दिवशीच गुलालाची उधळण केली गेल्याने निवडणुकीला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण ऐन माघारीच्या दिवशी ५७४ सदस्य आणि १६ सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध व्हावी याकरिता बहुतांश ग्रामपंचायतींकडून प्रयत्न केले जात होते. याकरिता माघारीच्या दिवसापर्यंत खलबते सुरू होते. त्याचबरोबर सरपंच बिनविरोध निवडीसाठीदेखील उमेदवारांची कसरत सुरू होती. जिल्ह्यातील १९६ ग्रामपंचायतींसाठी बुधवारी (दि.७) अर्ज माघारीचा दिवस होता. अर्ज माघारीच्या दिवशीच राजकीय घडामोडींना वेग आल्याने बहुतांश ग्रामपंचायत बिनविरोध करण्यात यश आले. त्याकरिता उमेदवारांसह कार्यकर्त्यांची चांगलीच धावपळ सुरू असल्याचे दिसून आले. गेल्या दोन दिवसांपासून माघारीसाठी प्रयत्न केले जात असले तरी, माघारीच्या दिवशी खऱ्या अर्थाने घडामोडींना वेग आणण्यात आला.

दरम्यान, अर्ज माघारीच्या दिवशी १६६५ सदस्यांनी अर्ज मागे घेतल्याने निवडणूक रिंगणात २९०९ उमेदवार आहेत. तर सरपंचपदाच्या ३७२ उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने ५७७ उमेदवारांमध्ये लढत होणार आहे. यामध्ये बहुतेक ठिकाणी तिरंगी, चौरंगी लढतीची शक्यता आहे.

निफाडमध्ये सर्वाधिक उमेदवार

रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार बागलाण, येवला, नांदगाव, कळवण, मालेगाव, नाशिक या तालुक्यांमधील ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. माघारीनंतर निफाडमध्ये २० ग्रामपंचायतींसाठी सर्वाधिक १४३ सरपंचपदाचे उमेदवार रिंगणात आहेत. त्या खालोखाल १०८ दावेदार चांदवड तालुक्यातून नशीब अजमावणार आहेत. बागलाण, निफाडच्या छाननीचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. त्यामुळे येथील आकडेवारी समोर आल्यानंतर आणखी चित्र स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा :

The post ग्रामपंचायत निवडणूक नाशिक : माघारीच्या दिवशीच उडाला विजयाचा गुलाल appeared first on पुढारी.