ग्रामपंचायत रणधुमाळी : उपसरपंचपदाचा फैसला 9 जानेवारीला

उपसरपंच www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील 196 ग्रामपंचायतींमध्ये 9 जानेवारीला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले असून, या सभेत उपसरपंच निवडला जाईल. त्यामुळे सार्‍यांचेच लक्ष या सभेकडे लागून राहिले आहे. निवडणूक लढलेल्या उमेदवारांना खर्च सादरीकरणासाठी 20 जानेवारीपर्यंतची मुदत असेल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गेल्या महिन्यात जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील 196 ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी रंगली होती. गावकर्‍यांनी त्यांच्या गावातील थेट सरपंच आणि सदस्यांची निवड केली. पण सार्‍यांच्या नजरा उपसरपंचाच्या निवडीकडे लागल्या आहेत. येत्या 9 तारखेला ग्रामपंचायतींमध्ये विशेष सभा बोलविण्यात आली आहे. सरपंचाच्या अध्यक्षतेत होणार्‍या या सभेत उपसरपंचाची निवड केली जाणार आहे. त्यामुळे या सभेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. उपसरपंचपदाची निवडणूक घोषित झाल्याने इच्छुक निवडून आलेल्या सदस्यांमधून गणिताची जुळवाजुळव करत आहे. त्यामुळे पुढील आठवडाभर तरी गावपातळीवर घोडेबाजार रंगणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शनानुसार निवडणुकीचे निकाल घोषित झाल्यानंतर पुढील 30 दिवसांमध्ये उमेदवारांना त्यांचा निवडणुकीचा खर्च सादर करायचा असतो. ग्रामपंचायतींमध्ये 20 डिसेंबरला मतमोजणी झाली होती. त्यानुसार 20 जानेवारीपर्यंत उमेदवारांना त्यांच्या खर्चाचा तपशील तालुका प्रशासनाकडे सादर करावयाचा आहे.

हेही वाचा:

The post ग्रामपंचायत रणधुमाळी : उपसरपंचपदाचा फैसला 9 जानेवारीला appeared first on पुढारी.