चंपाषष्ठी : अश्व ओढतो बारागाडे, चालत्या गाड्यांवर मल्ल करतात कसरती; पाहा कुठे

ओझर यात्रोत्सव,www.pudhari.news

ओझर (जि. नाशिक) : मनोज काळे

जेजुरीनंतरची उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत मोठी यात्रा, अशी ख्याती असलेल्या ओझरचे ग्रामदैवत असलेल्या खंडेराव महाराजांच्या यात्रोत्सवास सुरुवात झाली आहे. कोरोना महामारीच्या दोन वर्षांनंतर यंदाचा हा पहिलाच यात्रोत्सव असल्याने भाविकांसोबतच ओझरकरदेखील मोठ्या आनंदात आहेत.

मावळत्या सुर्यनारायणाच्या साक्षीने येळकोट येळकोट जय मल्हारच्या उद्घोषात लाखो भाविकांच्या उपस्थितीत मंगळवार (दि.29) या यात्रोत्सवास प्रारंभ झाला. पाच दिवस चालणार्‍या या यात्रोत्सवातील प्रमुख आकर्षण म्हणजे अश्व हा बारागाडे ओढतो आणि चालत्या-फिरत्या गाड्यांवर फिरणार्‍या सोंडग्यांवर पिळदार चमचमणारे शरीर असलेले मल्हार मल्ल कसरती करतात. भंडारा आणि खोबर्‍याच्या उधळणीने परिसर सोनेरी होऊन जातो. 200-250 वर्षांची परंपरा पाहण्यासाठी ओझर परिसरातील 40 वाड्या-वस्त्यांचे ग्रामस्थ हे दृश्य डोळ्यांत साठवून खंडेरावाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी हजेरी लावतात. यंदाही या भक्तीमय सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी लाखो भाविक उपस्थित होते.

या खंडेरायाची यात्रा पाच दिवस भरते. यात्रेचे द्वादश मल्हाररथ ओढण्यासाठी येथे देवाचा अश्व स्वत:हून येत असल्याची आख्यायिका आहे. यात्रेच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रातील नामवंत तमाशा मंडळे आपली कला सादर करतात, तर दुसर्‍या दिवशी मंदिर परिसरात याच तमाशा मंडळाच्या हजेरीचा कार्यक्रम होतो. अशी ही परंपरा आहे.

चंपाषष्ठी : असे असतात बारागाडे…

मानाचा गाडा (पगार कुटुंब), पगार गवळी, मधला माळीवाडा, वरचा माळीवाडा, क्षत्रिय मराठा समाज, कदम मराठा, शेजवळवाडी, सोनेवाडी, भडके वस्ती, सावतानगर, शिंदे मळा, अण्णा भडके यांची बैलगाडी.

सकाळी खंडेरायाची पारंपारिक पद्दतीने ग्रामपूजा केली जाते.  त्यानंतर प्रथे परंपरेनुसार बारा गाडे ओढणाऱ्या अश्वाला शाहीस्नान घालून त्याची देवभेट घडवून आणली जाते व गावातील प्रमुख मार्गावरून मिरवण्यात येते.  बारा गाड्यांना देवाचा हा ‘वारु’ जोडुन गोरज मुहुर्तावर तो हे बारा गाडे ओढून ख-या अर्थाने यात्रेला सुरुवात होते. हा थरार अनुभवण्यासाठी यंदाही हजारो आबालवृद्ध भाविकांनी गर्दी केली होती.  यावेळी चालत्या गाड्यांवर मल्हार मल्लांनी केलेल्या चित्तथरारक कसरतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते. भंडा-याची उधळण व सदानंदाचा येळकोट, येळकोट अशा घोषाने अवघा परिसर दुमदुमला होता.

हेही वाचा :

The post चंपाषष्ठी : अश्व ओढतो बारागाडे, चालत्या गाड्यांवर मल्ल करतात कसरती; पाहा कुठे appeared first on पुढारी.